समाजसेवक के. पी. पवार यांच्या निधनाने रायगडचा आदिवासी समाज पोरका झाला, निधनाने सर्वत्र शोककळा
रायगड (भिवा पवार) : माझा आदिवासी समाज शिकला पाहिजे माझा आदिवासी समाज एकजूट झाला पाहिजे, यासाठी शेवटच्या श्वासाबरोबर काम करणार अशी जणू शपथ घेतलेले व संपूर्ण रायगड जिल्ह्याला प्रत्येक आदिवासी वाडीतील प्रत्येक आदिवासी बांधवांना ओळखीचे असणारे के. पी. पवार उर्फ ह.भ.प. किसन पांडुरंग पवार यांचे दिनांक 4 सप्टेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने कांदळगाव (निजामपूर) येथे निधन झाले. के. पी. पवार हे कांदळगाव येथील वीज खात्यामध्ये नोकरीला होते. त्यांच्या निवृत्तीसाठी दोनच महिने बाकी होते. ते नेहमी म्हणायचे मी सेवानिवृत्त झालो की समाजाचे पूर्णवेळ काम करेन. माझ्या समाजातील प्रत्येक समाजातील मुले मला आय. ए. एस., तहसीलदार पी. एस. आय. झालेले मला पाहायचे आहे. त्यासाठी वाटेल ते प्रयत्न करायची माझी तयारी आहे. तसेच लोक एकत्र यावे म्हणून माणगाव तालुका आदिवासी समाज संस्थेची स्थापना करून त्यामध्ये सेक्रेटरी म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने काम पाहिले. संपूर्ण माणगाव तालुक्यातील संपूर्ण आदिवासी समाज एकसंघ केला. माणगाव वनवासी कल्याण आश्रम शाळेसाठी सर्वात मोठे योगदान त्यांचेच आहे. त्यांनी कधीच सुट्टीचा वार आपल्या कुटुंबासोबत साजरा न करता सुट्टीचा वार हा समाजासाठी दिला. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ते प्रसिद्ध होते. समाजातील भांडण तंटे अचूक सोडवून पवार हे सर्व न्याय-निवाडा अचूक करायचे.
रायगड जिल्ह्यातील आदिवासी समाजावर कुठेही अन्याय झाला तर के. पी. पवार मदतीला प्रथम धाऊन जायचे. आदिवासी समाजासाठी ते देवदूतच होते. वारकरी सांप्रदायाची पायी दिंडी असेल, सप्ताह असेल, कोणत्याही तालुक्यात क्रिकेट-कबड्डी सामने असतील तर के. पी. पवार नाही असे कधी झालेच नाही. ते उत्तम खेळाडू होते. टेबल टेनिस, धावणे, फुटबॉल, क्रिकेट या खेळात त्यांनी वीज मंडळाच्या खात्यातून अनेक पारितोषिकेही मिळवली आहेत. त्यांनी ऑलिम्पिकपर्यंत खेळात मजल मारलेली आहे. के. पी. पवार यांच्या निधनाने माझा पत्रकारितेतील गुरु हरपला असे वक्तव्य पत्रकार भिवा पवार यांनी केले. तर माझ्या राजकीय क्षेत्रातील मार्गदर्शकास मी मुकलो असे विधान रायगड जिल्हा परिषद सदस्य दयाराम पवार यांनी केले. तसेच सामाजिक क्षेत्रातील व आदिवासी समाजातील कोहिनूर हिरा आम्ही गमावला असे विधान बेरोजगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिनेश कातकरी यांनी केले. तर शिक्षण क्षेत्रातील खऱ्या मार्गदर्शकास आम्ही मुकलो असे विधान वनवासी कल्याण आश्रम माणगाव शाळेचे मुख्याध्यापक अरुण पाटील यांनी केले. तर माझे मार्गदर्शक व सामाजिक क्षेत्रातील महामेरू आज हरपला असे विधान पनवेलचे सामाजिक कार्यकर्ते एकनाथ वाघे गुरुजी यांनी केले.
माणगावच्या वनवासी कल्याण आश्रम आश्रम शाळा उतेखोल या शाळेच्या विकासात व प्रगतीत जडणघडणीत भरभराटीत के. पी. पवार यांचे खूप मोठे योगदान आहे. आदिवासी समाजाचे काम करताना त्यांनी कधीच कोणत्याच पदाची अपेक्षा केली नाही. त्यांचे दासपिंड 13/9/2020 रोजी आहेत तर धार्मिक विधी 16/9/2020 रोजी त्यांच्या वावंढळ (खालापुर) येथे त्यांच्या निवासस्थानी होणार आहेत. चांगल्या निस्वार्थी समाजसेवकास आपण मुकलो अशी प्रतिक्रिया आदिवासी समाजात व जनमानसात उमटू लागली असून आदिवासी समाजाचा आधार गेल्याची भावना समाजात व्यक्त होत आहे. ह.भ.प. के. पी. पवार यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.