माणगावचे माजी सभापती प्रभाकर उभारे यांना बंधुशोक


माणगांव (उत्तम तांबे) : 

माणगांव तालुका पंचायत समितीचे माजी सभापती प्रभाकर उभारे यांचे धाकटे बंधू सुधाकर बाळाराम उभारे यांचे दिर्घ आजाराने बुधवार दि. १२ ऑगस्ट २०२० रोजी पहाटे ५ वा. पारेख हॉस्पिटल जुहू, मुंबई याठिकाणी निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ५५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात चार भाऊ आणि दोन बहिणी, पत्नी, १ मुलगा, १ मुलगी असा मोठा परिवार आहे. सुधाकर उभारे यांच्या निधनाने माणगांवमधील उभारे कुटूंबीयांवर तसेच त्यांच्या मित्र परिवारावर मोठी शोककळा पसरली आहे. सुधाकर उभारे यांच्या निधनाबद्दल माणगांव तालुक्यातील पत्रकारांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

कै. सुधाकर उभारे यांचे बालपण तसे त्यांच्या मूळगावी माणगांव तालुक्यातील दाखणे गावांत गेले. त्यानंतर हे उभारे कुटुंबीय व्यवसायानिमीत्त माणगांवात अनेक वर्षांपासून स्थायिक झाले आहेत. कै. सुधाकर उभारे हे माणगांव तालुक्यातील उत्कृष्ट असे क्रिकेटर होते. साईनाथ साईबाबांचे ते निस्सीम भक्त होते. म्हणून त्यांच्या नावाने त्यांनी साईनाथ क्रिकेट संघाची स्थापना केली होती. गुगली गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट यष्टिरक्षक अशी त्यांनी अष्टपैलू कामगिरी साईनाथ कला व क्रिडा मंडळाच्या साईनाथ क्रिकेट क्लब माणगांवतर्फे त्यांनी आपल्या कारकीर्दीत करून तालुक्यातील अनेक मैदाने गाजवून अनेकवेळा आपल्या संघाला एकहाती सामने जिंकून दिले आहेत. ते एक उत्कृष्ट समालोचक होते. मुर्ती लहान पण किर्ती महान होती. पिळदार शरीरयष्टी असलेले सुधाकर उभारे कबड्डी, कुस्ती,कराटे, खोको, हॉलीबॉल, बॅटमिंटन, कॅरम आदी खेळात ते तरबेज होते. त्याचबरोबर ते उत्कृष्ठ गायक होते. आपल्या हसमुख, प्रेमळ, दिलदार स्वभावामुळे त्यांनी संगळयांना आपलेसे केले होते. नवरात्रौत्सव, दहिहंडी, गणेशोत्सव अशा सर्वच सण उत्सवात सुधाकरांचा हिरारीने सहभाग होता. या त्यांच्या अष्टपैलू नेतृत्वामुळे तसेच सर्व धर्मसमभाव व एकतेच्या भावनेतून बहुजन समाजात सलोखा निर्माण करीत होते. त्यांच्या येथे दरवरर्षी प्रभाकरदादा उभारे मित्रमंडळातर्फे बांधण्यात येणाऱ्या दहीहंडी उत्सव कार्यक्रमात ते बहारदार समालोचन करीत असत. गोकुळाष्टमी दिवशी त्यांचे निधन झाल्याने त्यांच्या समालोचनाची व व्यक्तीमत्वाची आठवण अंत्यविधीला उपस्थित मित्र व नागरिकांनी काढली. ते मित्रांच्या जीवाला जीव देणारे व्यक्तिमत्व होते. एखादी गोष्ट करायची म्हणजे करायची हा त्यांचा खमका स्वभाव होता. आपल्या जवळच्या अनेक मित्रांना त्यांनी शिर्डी येथे आपल्या स्वखर्चाने नेवून साईबाबांचे दर्शन घडवून दिले आहे. गेली वर्षभर ते पोटाच्या विकाराने आजारी होते. मंगळवार दि.११ ऑगस्टला सायंकाळी अचानक त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबई येथील लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर पुन्हा पारेख हॉस्पिटल जुहू मुंबई येथे दाखल करण्यात येऊन त्याठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा अंत्यविधी माणगांव येथील स्मशानभूमीत बुधवारी सायंकाळी ४ वाजता करण्यात आला. यावेळी जवळचे मित्र,नातेवाईक व पत्रकार उपस्थित होते. त्यांच्या निधनाने माणगाव तालुक्यातही सर्वत्र शोककळा पसरली आहे. 

Popular posts from this blog