बलात्कार व खून प्रकरणातील आरोपीला अटक
रोहा पोलीसांनी १२ तासांच्या आत आरोपीला केले गजाआड
रोहा पोलीसांनी १२ तासांच्या आत आरोपीला केले गजाआड
रोहा (रविना मालुसरे) :
रोहा तालुक्यात एक संतापजनक व अमानुष घटना घडली. रोहा तालुक्यातील तांबडी बुद्रुक या गावामधील 14 वर्षाची अल्पवयीन मुलगी आपली दुचाकी घेऊन ताम्हणशेत येथील आपल्या शेतामध्ये काम करीत असलेले आजोबा यांना आणण्यासाठी सायंकाळी गेली. त्यानंतर रात्री आठ वाजेपर्यंत मुलगी परत आली नाही म्हणून तिची आई व इतर घरातील मंडळी यांना काळजी वाटू लागली. मुलीचा शोध घेण्याकरिता घरातील मुलीचे आई-वडील व इतर ग्रामस्थ ताम्हणशेत बुद्रुक येथे गेले असता त्याठिकाणी मुलगी चालवीत घेऊन आलेली होंडा ऍक्टिवा मोटरसायकल रस्त्याच्या कडेला उभी असलेली दिसली. परंतु मुलगी कोठेही ही आजूबाजूच्या परिसरात दिसून येत नव्हती.
रात्रीचे आठ वाजले यामुळे परिसरात अंधार पसरला होता. त्यामुळे ताम्हणशेत बुद्रुक गावाकडे मध्यभागी मोठ्या दगडावर मुलगी विवस्त्र व मृत अवस्थेत पडलेली रात्री साडेनऊच्या सुमारास आढळून आली. कोणीतरी अज्ञात आरोपीने सदर मुलीस अज्ञात स्थळी नेऊन तिच्यावर अतिप्रसंग करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिला जिवे ठार मारल्याचे लक्षात आले.
सदर घटनेची माहिती रोहा पोलीस ठाण्यास मिळतात रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. अनिल पारस्कर अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सचिन गुंजाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी रोहा श्री. सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक श्री. नामदेव बंडगर तातडीने पोलीस पथकासह घटनास्थळी धावले. परिस्थिती लक्षात घेऊन पीडित मुलीचा मृतदेह तपासणीकरिता जे.जे.रुग्णालय मुंबई या ठिकाणी पाठवून, त्याच दरम्यान आरोपींना ताब्यात घेण्याकरिता जिल्ह्यातील गुन्हे उघडकीस आणण्यात हातखंडा असलेल्या अधिकाऱ्यांना रोहा येथे बोलावून आठ तपास पथके तयार करुन तपासाची चक्रे वेगाने फिरून घटनास्थळाच्या आजूबाजूच्या गावाचे संशयित इसमांकडे विचारपूस करून बारा तासाच्या आत गुन्हा उघडकीस आणून गुह्यामध्ये एका आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यास अटक करण्यात आली आहे. सदर अटक आरोपी याच्याकडे या गुन्ह्यामध्ये इतर कोणाचा सहभाग आहे का? याबाबत तपास सुरू आहे. रायगड जिल्ह्यातील फॉरेन्सिक व्हॅनच्या मदतीने घटनास्थळावरील भौतिक पुरावे गोळा करण्यात आले आहेत.
सदर गुन्हा उघडकीस आणणेकामी पोलीस अधीक्षक श्री. अनिल पारस्कर यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन गुंजाळ, उपविभागीय पोलिस अधिकारी रोहा श्री. सूर्यवंशी, उपविभागीय पोलीस अधिकारी अलिबाग श्रीमती सोनाली कदम ,पोलीस निरीक्षक श्री. नामदेव बंडगर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा श्री. जे. ए. शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. गिरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री .सुभाष जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सोनके, पोलीस उपनिरीक्षक श्री. खंडागळे, पोलीस उपनिरीक्षक श्री. शेंडगे, स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे रोहा येथील पोलीस स्टाफ यांनी अथक प्रयत्न करून बारा तासांच्या आत गुन्हा उघडकीस आणला. याबाबत रोहा पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं 54/2020, भा.दं.वि.स.कलम 376(1), 302, 201 बालकांचे लैंगिक अपराधा पासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4, 8 प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी रोहा श्री. सूर्यवंशी हे करीत आहेत.