कै. वसंतराव नाईक जयंती निमित्ताने मालसई येथे कृषी संजीवनी सप्ताह उत्साहात साजरा
रोहा (रविना मालुसरे) :
रोहा तालुक्यातील मालसई येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीच्या निमित्ताने कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत दरवर्षी साजरा होणारा कृषी संजीवनी सप्ताह यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोहा तालुक्यातील मालसई येथील विठ्ठल मंदिरात दि.२ जुलै २०२० रोजी साजरा करण्यात आला.
कृषी विभागाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये शेतकरी हिताच्या विविध योजनांची शेतकरी वर्गाला सखोल माहिती देण्यात आली. भात लागवडीच्या वेगवेगळ्या पद्धती, भात पिकांवरील विविध किडी/ रोग व नियंत्रण, जमीन/आरोग्य पत्रिकेनुसार खत वापर यांविषयी कृषी पर्यवेक्षक दिगंबर साळे व बी. पी. पाटील यांनी मार्गदर्शन केले.
विभागीय कृषी अधिकारी मिलिंद जाधव व तालुका कृषी अधिकारी कुमार जाधव यांच्या हस्ते महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत प्रगतशील शेतकरी प्रभाकर चाळके यांच्या शेतावर आंबा कलमांच्या लागवडीचा शुभारंभ करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी उपविभागीय अधिकारी मिलिंद जाधव, तालुका कृषी अधिकारी कुमार जाधव, कृषी पर्यवेक्षक दिगंबर साळे, बी. पी. पाटील, कृषी सहाय्यक कु. पल्लवी उबाळे, कृषी सहाय्यक मीनल शिंदे इत्यादी अधिकारी वर्ग उपस्थित होता. तसेच मालसई गावांतील शेतकरी वर्गाने सोशल डिस्टंसिंग ठेवून कार्यक्रमाचा लाभ घेतला.
हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कृषी सहाय्यक कु. पल्लवी उबाळे यांनी अथक परिश्रम घेतले.