काळनदीत हातबाँब टाकून मासेमारी करणाऱ्यांवर नगरपंचायत करणार फौजदारी कारवाई
माणगांव, दि. ८ मे (उत्तम तांबे) :
माणगांव नगरपंचायत हद्दीतील काळनदीचे पात्रात काही नागरिक मासेमारी करीता हातबाँब तसेच सिंबूश यांसारख्या घातक किटकनाशकाचा वापर करीत असल्याचे निदर्शनात येत आहे. त्यामुळे काळ नदीचे पिण्याचे पाणी दूषीत होऊन नागरिकांच्या आरोग्यास धोका होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. तरी यापुढे मासेमारीकरिता कोणतीही व्यक्ती हातबाँब किंवा सिंबूश या सारख्या औषधांचा वापर करताना निदर्शनास आल्यास संबधित व्यक्तींवर कायदेशीर फौजदारीची कारवाई करण्यात येईल अशी जाहीर सूचना माणगांव नगरपंचायतीद्वारे करण्यात आली आहे.
माणगांवच्या काळ नदीत गेल्या अनेक वर्षांपासून अशा प्रकारे मासेमारी करण्यात येत असून या बाबतच्या बातम्याही प्रसिद्ध झालेल्या आहेत. या मध्ये पारंपारिक मासेमारी सोडून जास्त कमाईच्या लोभापायी मोठ्या प्रमाणात मासेमारी करण्याचे हेतूने हा प्रकार सुरु असल्याचे बोलले जात आहे. शिंबूश हे किटकनाशक वापरल्याने, ते ज्या ठिकाणी नदीपात्रात टाकले जाते त्या ठिकाणी खवय्यांमध्ये विशेष मागणी असलेली नदीतील ताजी कोळंबी, शेवंड मच्छी मारतात. किटकनाशकाचे प्रभावाने या कोळंबीच्या डोळ्यांवर परिणाम होऊन ती किनाऱ्यालगत सहज पकडता येते असे बोलतात. व हीच कोळंबी बाजारपेठेत विक्रीला आणली जाते.
तसेच एका विशिष्ठ प्रकारे एक खास प्रकारच्या स्फोटकांचा वापर करुन बनविलेले हातबाँब, बाटली बाँब वापरुन त्याचे स्फोट नदीचे पाण्यात करुन मासेमारी केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. हे बाँब माणगांव काळनदी वरील रेल्वे पूलावर रेल्वे येताच रेल्वेच्या मोठ्या आवाजात बरोबर या वेळेत नदी पात्रातील पाण्यात टाकले जातात. कारण स्फोटंकांचा आवाज इतर कोणाला ऐकू येऊ नये. अशी खबरदारी घेत मासेमारी केली जात असल्याचे बोलले जात आहे. हा स्फोट करताना मासेमारी करणाऱ्याला सूद्धा गंभीर दुखापत प्रसंगी प्राणहाणीचा धोका असल्याचे लोकां मधून बोलले जात आहे.
यामुळे अशा प्रकारच्या हव्यासा पायी केलेल्या अपारंपारिक मासेमारी मुळे अनेक जातीचे मासे तसेच जलचर जीव मोठ्या प्रमाणात मरतात, पाण्यावर तरंगताना दिसतात. काही वेळाने ते पाण्यात कुजतात, पाण्याला दूर्गंधी येते हे पाणी माणगांवकर पिण्यासाठी वापरतात याचे प्रदूषण होऊन जलचर जीवसृष्टीचा नाश होत असल्याच्या तक्रारी झाल्या आहेत. स्फोटात मोठ्या प्रमाणात मारलेली मच्छी गोळा करुन बाजारात विक्रीला आणली जाते. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात येऊ शकते. अशा प्रकारच्या गोष्टी घडत असूनही याकडे संबधितांनी सतत लक्ष देणे गरजेचे आहे. अशा प्रकारे चूकीच्या मार्गाने मासेमारी घातक आहे. या साठी नगरपंचायत प्रशासनाने नदीकिनारी जनजागृती साठी सूचना फलक लावून या गोष्टी नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे.