कोरोना प्रादुर्भावामुळे छायाचित्रकारांच्या अडचणी वाढल्या - राकेश मोरे
रोहा (समीर बामुगडे) :
दिवसेंदिवस कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. तर वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आहे. त्यामुळे छायाचित्रकार अडचणीत आले असून त्यांच्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले असल्याची व्यथा रोहे वरसे येथील छायाचित्रकार राकेश मोरे यांनी पत्रकारांसमोर मांडली आहे.
गेल्या ४५ दिवसांपासून रोहे तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यातील एकाही फोटो स्टुडिओ मालकांनी आपले स्टुडिओ उघडले नाही. तर आतापर्यंत शासनाने दिलेल्या निर्णयाचे फोटो स्टुडिओ चालकांनी तंतोतंत पालन केले असून यापुढेही शासन निर्णयानुसारच आम्ही आमचा व्यवसाय चालवू अशाप्रकारची आपली व्यथा मांडताना फोटोग्राफर मोरे यांनी जिल्ह्यातील बहुतांश भागात परिस्थितीनुसार लॉकडाऊन शिथील करण्यात आला असून जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानासह अन्य दुकानेही चालू करण्यात आली आहेत. तर कापड व्यापारी, ज्वेलर्ससह फोटोग्राफर तसेच अन्य काही दुकानांना वगळण्यात आले आहे. त्याचा फटका त्या त्या व्यवसायिकांसह फोटोग्राफी व्यवसायालाही बसत आहे.
यावर्षी लग्न सराईलाही कोरोनाचा मोठा फटका बसल्याने फोटोग्राफी व्यवसायाचे संपूर्ण वर्षाचे बहूतांश बजेट त्यावरच अवलंबून असल्याने त्याचीही झळ व्यवसायाला बसली असून यापुढे जीवन जगताना फार मोठ्या आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तर आमचे व्यवसायिकांचे बहुतांश दुकान गाळे भाडेतत्वावर आहेत. तर काहींनी व्यवसाय वृद्धीसाठी कर्जही घेतले असल्याने परिस्थिती अशीच राहिली तर कर्जाचे हप्तेही कसे फेडायचे व दुकानाचे भाडे कुठून भरायचे या समस्येसह परिवाराचे संगोपन देखील कसे करायचे हेच प्रश्न सतावत राहिले असून शासनाने फोटोग्राफर व्यवसायिकांचा विचार करून रितसर व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी प्रतिक्रिया शेवटी त्यांनी दिली आहे.