रायगड जिल्हा विक्रम मिनिडोअर संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
खालापूर (संतोष शेवाळे) :
कोरोना या संसर्गजन्य विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातले असून या विषाणूची झळ देशासह महाराष्ट्रालाही लागली असून केंद्र शासनाने देशात लॉकडाऊन घोषित केला परंतु याचा परिणाम लहान मोठे उद्योगधंदे, सरकारी तसेच खाजगी प्रवासी वाहतूक सेवेवर झालेला दिसून येत आहे. या लॉकडाऊनमूळे रिक्षा, सहा आसनी विक्रम मिनिडोअर, इको, टाटा मॅजिक या वाहतूक सेवा ठप्प झाल्याने हा व्यवसाय करणाऱ्या चालक, मालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील विक्रम मिनिडोअर चालक मालक संघाकडून आपल्या विविध मागण्यांसह आर्थिक सहकार्य करावे याकरिता रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना निवेदन देण्यात आले.
ज्या सरकारी कर्मचाऱ्यांना कामावर न जाता शासन पगार देत आहे तो त्वरीत बंद करण्यात यावा.
केजरीवाल सरकारने टॅक्सी/ रिक्षा चालकांच्या खात्यात रक्कम जमा करून ज्या प्रमाणे मदत केली त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने प्रत्येक टॅक्सी/ रिक्षा बॅच, परमिट धारकाला लॉकडाऊन कालावधीकरीता प्रति महिना रूपये ८ ते १० हजार नुकसान भरपाई भत्ता देण्यात यावा.
विक्रम, मिनिडोअर, इको, टाटा मॅजिक चालकांच्या आर्थिक स्थिती लक्षात घेता आर.टी.ओ. कार्यायाने सदर वाहनांचे पासिंगची मुदत ही कोणत्याही प्रकारचा रोड टॅक्स किंवा इतर शुल्क न आकारता पुढील दोन वर्षाकरीता वाढवून द्यावी. तसेच वाहनांच्या विम्याची मुदत देखील कोणताही प्रिमियम न घेता दोन वर्षाकरीता वाढवून द्यावी.
तसेच शासन कोरोना व्हायरस मुळे झालेली हानी भरून काढण्यासाठी विविध स्तराला आर्थिक मदत व पॅकेज, सवलतींची घोषणा करत आहे. परंतू विक्रम, मिनिडोअर, इको, टाटा मॅजिक चालकांसाठी अद्यापर्यंत कोणतीही घोषणा केल्याचे दिसून येत नाही. तरी हा व्यवसायाच्या अनुषंगाने योग्य त्या सवलती व पॅकेज घोषीत करावे.
रायगड जिल्ह्याती जो भाग MMRTA क्षेत्रात येतो तेथील वाहनांची वयोमर्यादा २० वर्षावरून २५ वर्षाकरीता कारवी व RTA क्षेत्रातील वाहनांची वयोमर्यादा राज्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणे २५ वर्षावरून ३० वर्षे करावी.
आशा प्रकारे रायगड जिल्हा विक्रम मिनिडोर संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजयभाऊ पाटील यांनी निवेदनात उल्लेख केला आहे. तसेच वेळ आली तर रस्त्यावर पण आम्ही उतरू शकतो असेही त्यांनी शासनाला सूचित केलेले आहे.