महाराष्ट्र व रायगडकारांचे आभार मानत परप्रांतीय निघाले गावाला
खालापूर (संतोष शेवाळे) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खालापूर तहसिल प्रशासनाने तालुक्यातील परप्रांतीयांची त्यांच्या राज्यात सुखरूप पोहोचविण्याची तयारी केली असून वावोशी विभागातून १७२ परप्रांतीय मजुरांना ८ बसमधून तर खालापूर येथून ३६ बसमधून ८१२ परप्रांतीय मजुरांना एस टी बसने पनवेल रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आली.
या परप्रांतीय मजुरांनी ई-पास आणि वैद्यकीय प्रमाणपत्र काढून नोंदणी केली होती. तहसीलदार इरेश चप्पलवार यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल, ग्रामसेवक, शिक्षक यांनी खालापूर तालुक्यातील या परप्रांतीय मजुरांची माहिती संकलित करून त्यानुसार प्रत्येक बसमध्ये २२ मजूर याप्रमाणे वावोशी येथून ८ बसमधून १७२ मजूर तर खालापूर येथून ३६ बसमधून ८१२ मजुरांची फिजिकल डिस्टनसिंगनुसार आसनव्यवस्था करून त्यांना सॅनिटायझर, पाणी आणि त्यांच्या जेवणाची व्यवस्था करून त्यांना पनवेल रेल्वे स्थानकातून उत्तर प्रदेशकडे जाणाऱ्या रेल्वेमध्ये बसवून रवानगी करण्यात आली. याकरिता वावोशी विभागातून मंडळ अधिकारी संदीप जाधव, तलाठी प्रशांत ढाकणे, राठोड, ग्रामसेवक श्रीखंडे, सरपंच महेश पाटील, शिक्षक संदीप पाटील, प्रसाद वाघमारे, कोतवाल नरेश भोसले, गोरठण पोलीस पाटील विद्याधर जाधव, संकेत मोरे, भरत पाटील, पत्रकार संतोष शेवाळे, जतिन मोरे यांनी विशेष मेहनत घेतली.