नवघर गावात कोरोना पॉझिटीव्ह रूग्णाची नोंद
माणगांव तालुक्यातील बाधीतांची संख्या पोहचली 35 वर
माणगांव (सचिन पवार) : तालुक्यातील लोणेरे विभागातील नवघर गावात एक रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह सापडला आहे. या व्यक्तीचा स्वॅब रिपोर्ट बुधवारी (दि. 27) रात्री उशीरा प्राप्त झाला असल्याची माहिती माणगांवच्या तहसीलदार प्रियंका आयरे-कांबळे यांनी दिली. त्यामुळे तालुक्यात बाधीत रुग्णांची संख्या 35 वर पोहचली आहे.
नोकरी निमित्त मुंबई, पुणे तसेच उपनगर मध्ये अडकून पडलेले चाकरमानी कुटूंबासह माणगांव तालुक्यातील आपल्या गावी परतले आहेत. त्यांना प्रशासनाने 14 दिवस क्वारंटाईन करून ठेवले होते. त्यातून काही जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. बुधवारी रात्री नवघर गावात एका कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाची नोंद झाली. 47 वर्षीय ही बाधित व्यक्ती माटूंगा मुंबई येतुन गावात आली होती. मात्र क्वारंटाईनमध्ये असताना त्रास जाणू लागला असता माणगांव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे त्याचे स्वॅब घेऊन जे-जे रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. बुधवारी रात्री या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे.
दरम्यान, तालुक्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता कामाव्यतीरिक्त बाहेर न पडता घरातच राहावे, सुरक्षित राहावे, असे आवाहन तालुक्याच्या प्रांताधीकरी प्रशाली जाधव यांनी केले आहे.