माणगाव रास्तभाव धान्य दुकानातून अन्नधान्याचे मोफत वाटप
माणगांव (उत्तम तांबे) :
केंद्र सरकारच्या गरीब कल्याण योजनेअंतर्गत प्राधान्य गट व अंत्योदय शिधाप्रतीकेतील लोकसंखेनुसार सार्वजनीक वितरण व्यवस्थेतील एप्रिल ते जून या कालावधीकरीता राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अनुज्ञेय असलेल्या अन्नधान्याव्यतिरीक्त प्रतिव्यक्ती मोफत अन्नधान्य वितरीत करण्याचे आदेश शासनाने निर्गमित केले आहेत.
या आदेशानुसार माणगाव शहरातील निलेश थोरे यांनी आपल्या रास्तभाव दुकानातून प्राधान्य गट व अंत्योदय शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती मोफत पाच किलो तांदुळ देण्यास सुरवात केली आहे. यादरम्यान माणगाव तहसिलदार प्रियंका आयरे यांनी या रास्तभाव धान्य दुकानाला भेट देऊन पाहणी केली.
निलेश कुंडलिक थोरे हे माणगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघ रास्तभाव धान्य दुकान खांदाड-१ चे सभापती असून शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य वाटप करण्यासाठी स्वतः जातीने लक्ष देऊन काम करीत आहेत. आलेल्या वयोवृद्ध शिधापत्रिकधारकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच बसण्यासाठी खुर्च्यांचीही व्यवस्था श्री. थोरे यांनी केली आहे. अन्नधान्य वितरण करताना शिधापत्रक धारकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये अशी दक्षता देखील घेण्यात आली आहे. कोरोनाच्या संकटात कोणीही उपाशी राहणार नाही या शासनाच्या धोरणाबाबत अंत्योदय योजनेकरिता प्राधान्य गटातील कार्डधारकांना तसेच केशरी कार्डधारकांना प्रतिव्यक्ती प्रतिकिलो व किती दराने अन्नधान्य वितरण करण्यात येते याबाबत निलेश थोरे यांनी माहिती दिली आहे.