सोशल मीडियावरील अवाहनानंतर आदिवासी कुटूंबांना मिळाले तब्बल ७ टन धान्य व जीवनावश्यक वस्तू
रोहा (समीर बामुगडे) :
कोरना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात केलेल्या लॉकडाऊनमुळे डोंगरदऱ्यात राहणाऱ्या आदिवासी समाजावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला होता. या समाजातील तरुण मोलमजुरी करून आपला चरितार्थ चालवितात. परंतु लॉकडाऊनमुळे रोजगार नसलेल्या आदिवासी समाजावर भूक बळीचे संकट येऊ नये यासाठी सरकारी मदत पोहोचेपर्यंतच्या काळात तात्पुरती मदत म्हणून जीवनावश्यक वस्तू देण्याचे आवाहन युसूफ मेहेरली सेंटरचेचे सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर व पत्रकार लक्ष्मण ठाकूर यांनी फेसबुक आणि व्हाट्सएपच्या माध्यमातून केले. या अवाहनाला तात्काळ प्रतिसाद देत खारघर येथील शाश्वत फौंडेशनच्या अध्यक्षा बिना गोगरी, सदस्य जयेश गोगरी, ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते चारुदत्त पाटील, नवी मुंबई पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे, एकता सामाजिक संस्था कामोठे, भारत रक्षा मंच व इतर देणगीदारांनी तांदूळ कांदे, बटाटे, गोडे तेल, तिखट,मिठ, हळद यांसारख्या जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. दि.२८ मार्च ते २ एप्रिल या पाच दिवसीय अभियानांतर्गत तब्बल ६ टन ७०४ किलो धान्य व इतर साहीत्य जमा झाले. ज्यातून ५ किलो तांदूळ,१ किलो कांदे, १ किलो बटाटा, १ किलो तुरडाळ, १ किलो मीठ, १ लिटर खाद्यतेल, २०० ग्रॅम मिरची पावडर, ५० ग्रॅम हळद या सर्व वस्तू मिळून जवळ-जवळ साडेदहा किलोचे एक किट एका कुटुंबास असे कर्नाळा, तारा, आपटा, बारापाडा, चावणे भागातील ६५४ आदिवासी कुटूंबाना वाटण्यात आले. हा मदतीचा हात देणारे पनवेलचे ए.सी.पी.रवींद्र गिड्डे, पनवेल तालुक्याचे पोलीस निरीक्षक अशोक राजपूत, लक्ष्मण ठाकूर व पोलीस कर्मचारी यांनी कोरलवाडी आदिवासी वाडीमधील सर्व आदिवासी कुटूंबांना दिले. त्यानंतर बानुबाई वाडी, भोकर वाडी, हाडंबा वाडी, बामण डुंगी, लहुची वाडी आखाडा वाडी, विठ्ठल वाडी, खैराटवाडी, घेरावाडी, सारसई येथील दोन धनगर वाड्या खालची, टपोरवाडी,वरची वाडी, वडमाळ, खैरास अशा सोळा आदिवासी वाड्या व आपटा गावांतील ६५४ कुटुंबांना मदतीचा हात दिला आहे. यादरम्यान नवी मुंबई परिमंडळचे सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे यांनी स्वतः वाड्यांतील २८० कुटुंबांना मदत केली आहे. विपुलभाई, दिनेश रावरिया प्रशांत कोतवाल, मालती म्हात्रे, मोटीवेशनल स्पीकर राजेश रसाळ यांनी ही मदत गरजूंपर्यंत पोहोचविण्यास सहकार्य केल्याबददल पत्रकार लक्ष्मण ठाकूर यांनी सर्वांचे आभार व्यक्त करून बाधित कुटुंबांपर्यंत शासनाकडून रेशन धान्य पोहोचण्यास सुरवात झाल्यामुळे सध्या हा मदतीचा उपक्रम काही काळासाठी थांबवित असल्याचे सांगितले आहे.