संचारबंदीत माॅर्निंग वाॅक माणगांवकरांना पडले महागात
घराबाहेर पडू नका, रायगड पोलीसांचा सक्त इशारा असतानाही लोक बेफीकीर
माणगांव (उत्तम तांबे) :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घराबाहेर पडू नका, असे आवाहन वारंवार शासन, स्थानिक प्रशासनाकडून करण्यात येत आहे. परंतु, काही नागरिक याबाबत अद्याप गंभीर नसल्याचे दिसून येते. लाॅकडाऊन मध्येही मॉर्निंग वॉकसाठी मोकळ्या रस्त्यावर बाहेर पडत आहेत. अनेकजणांना रायगड पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. आज माणगांव शहरातही पोलिस उपअधिक्षक शशिकांत काशिद यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पोलीस निरीक्षक इंगवले यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुर्वे, पोलीस उपनिरीक्षक करे, महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियंका बुरुंगले आणि २० पोलीस कर्मचारी यांच्या पथकाने मॉर्निंग वॉक करण्याकरिता घराबाहेर पडलेल्या ३८ पुरुष आणि १२ महिला अशा ५० माणगांवकरांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ६८ नुसार धडक कारवाई करण्यात आली आहे.
१८ एप्रिल रोजी सकाळी माणगांव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोर्बा रोड, बामणोली रोड, निजामपूर रोड, कालवा रोड, खर्डी क्रीडा संकुल पर्यंत मॉर्निंग वॉक करण्याकरिता घराबाहेर पडलेल्या ५० माणगांवकरांवर ही कारवाई करण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी गर्दी न करता घरी राहणे आवश्यक आहे. तरीही काही नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. या मध्ये सुशिक्षीत नागरिकही मागे नाहीत, या मुळेच यापुढे पोलीस व प्रशासनास सहकार्य करावे; तसेच काही लोक सायंकाळीही माणगांव मधिल अंतर्गत रस्त्यांवर दररोज फिरायला बाहेर पडत आहेत. त्यांनीही या पासून बोध घ्यावा पोलीसांचे सर्वांवर बारकाईने लक्ष आहे. घरीच रहा काळजी घ्या, सोशल डिस्टन्सिंग चे नियम पाळा. अन्यथा कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल. असा सक्त इशारा या कारवाईतून पोलिसांनी दिला आहे. कोरोना चा अर्थ कोई रोड पर ना निकले असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यापूर्वीच म्हटले आहे, हे माहीत असूनही लोक बेफीकीर वर्तन करीत आहेत.