लॉकडाऊन कालावधीत बाहे येथील भाजीवाले देत आहेत उत्तम सेवा
खांब-रोहे (नंदकुमार मरवडे) :
देशभरात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार उडाला असतानाच त्यातच ३ मे पर्यंत पुकारलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवहारांवर निर्बंध आले आहेत. अशातच रोहे तालुक्यातील भाजीपाल्याच्या पिकासाठी विशेष प्रसिद्ध असलेल्या बाहे गावातील शेतकरी वर्गाला तालुका प्रशासन यंत्रणेने आपला व्यवसाय करण्याची संधी दिल्याने शेतकरीवर्ग आपल्याकडील ताजी भाजी रोहे शहर आणि परिसरात विक्रीसाठी आणून चांगली सेवा देत आहेत.
कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने संंपूर्ण देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन सुरू केला आहे. तर २५ मार्च रोजी पहिल्या टप्प्यातील लॉकडाऊच्या वेळी सर्वच व्यवहार जवळ जवळ ठप्पच होते. तर जीवनाश्यक वस्तूंची दुकानेही बंदच होती. त्यातच फळे व भाजीपालाही नागरिकांना चार-चार दिवस मिळत नव्हता. कोरोनामुळे सर्वच व्यवहार बंद झाल्याने बाहे गावातील भाजी पिकविणाऱ्या शेतकरी वर्गावर आपल्या मालाला उठावच होत नसल्याने उपासमारीची वेळ आली होती. त्यामुळे संपूर्ण रोजीरोटीसह आपल्या पुढील भवितव्याची चिंता भेडसावत असतानाच रोहे तालुका तहसिलदार कविता जाधव व सर्व प्रशासन यंत्रणा तसेच नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांनी स्थानिक पातळीवर महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन किराणा दुकानदार व भाजीवाले यांना सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत आपला व्यवसाय करण्याची संधी दिल्याने दुकानदारांसह भाजीविक्रेत्यांना मोठाच दिलासा प्राप्त झाला आहे. तर विशेष म्हणजे सर्वत्र कोरोनामुळे आर्थिक गाडा थांबलेला असतानाच बाहे येथील शेतकरी वर्गाला भाजी विक्रीसाठी मार्केट उपलब्ध झाल्याने बाहे ग्रामस्थांनी तालुका प्रशासन यंत्रणेचे विशेष आभार मानले आहेत.