कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर एक्सेल कंपनीने जपली सामाजिक बांधिलकी
खांब-रोहे (नंदकुमार मरवडे) :
रोहा एमआयडीसी मधील एक्सेल इंडस्ट्रीज ही कंपनी नेहमीच सामाजिक बांधिलकी उपक्रमाअंतर्गत समाजासाठी बहुउपयोगी उपक्रम करण्यात अग्रणीय असते. तर साऱ्या जगभर थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता समाज घटकातून अनेक मदतीचे हात पुढे सरसावले आहेत. दरम्यान, रोह्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीमधील नामवंत एक्सेल कंपनीनेही याकामी आपले मोलाचे योगदान दिले आहे.
ग्रामीण भागातील महत्वाच्या विषयात जसे पाणी संवर्धन, शेती मार्गदर्शन, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण व महिला सक्षमीकरण असे उपक्रम कंपनीचे मालक आश्र्विनभाई श्रॉफ यांच्या स्वप्नातून समाजाला योग्य आयाम देण्याचे कार्य अविरत पणे चालू आहे. सध्या कोविड १९ या व्हायरसच्या संकटात सर्व जग, देश, शहर, गावे सापडली आहेत. या काळात एक्सेल इंडस्ट्रीजच्या सीएसआर रोहा विभागाचे प्रमुख सुशिल चंद्रकांत रुळेकर यांच्या संकल्पनेतून व शिवण प्रशिक्षण दिलेल्या महिलांना मार्गदर्शन करून मोठ्या प्रमाणात मास्क बनवायचे काम रोहा, वाशी, लांढर व रोठ बुद्रूक या गावातील चार गटातील महिलांना काम देण्यात आले. या अडचणीच्या काळात महिलांना एक मोठ्या आर्थिक मदतीचा हातभार मिळाला. या उपक्रमात एक्सेल इंडस्ट्रीज रोहा कंपनीचे प्रमुख आदित्य निगम, पर्सनल डीपा. प्रमुख हाशिराम मंचेकर व कंपनीचे पीआरओ नितीन जोशी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. मोठ्या संख्येने बनविलेले मास्क विविध सरकारी यंत्रणा, गाव यांना देण्यात आले. तसेच पंचायत समितीच्या रोहा तालुक्यातील सर्व कोरोना नियंत्रण कक्षांतील सर्व कर्मचाऱ्यांना बीडीओ व सीईओ अलिबाग यांच्या हस्ते मास्क देण्यात आले. पोलीस यंत्रणा, गरजू व बाहेर गावातील अडकलेले कामगार यांना तहसील विभागात मोठ्या प्रमाणात अन्न धान्याची मदत करण्यात आली. गावागावात कोरोना बद्दलची जनजागृती व निर्जंतुकीकरण करण्यासाठी औषध देण्यात आले. महिलांना सक्षम बनवायचे काम केले आज हे गट विविध संस्थांचे, ग्रामपंचायतीचे काम घेत आहेत व त्यांना मोठी आर्थिक सहायता झाली आहे. एक्सेल कंपनीचे व्हीआरटीआय संस्थेचे वतीने ग्रामपंचायत नागोठणे व कोंडगाव येथे गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, वि.अ. महारुद्र फरतडे यांचे शुभ हस्ते कोरोना नियंत्रण कक्षातील सर्व स्टाफला मास्क चे वाटप करणेत आले यावेळी सरपंच, सदस्य उपस्थित होते.