माणगांव येथील साई सुविधा शिवभोजन केंद्राला पालकमंत्री आदिती तटकरे यांची सदिच्छा भेट
माणगांव (उत्तम तांबे) : माणगांव बाजारपेठेतील निजामपूर रोड येथे सुविधा उभारे यांनी साई सुविधा शिवभोजन केंन्द्र सुरू केले आहे. या शिवभोजन केंद्राचे उद्घाटन माणगांवच्या तहसिलदार प्रियंका आयरे यांच्या हस्ते करण्यात आले. या साई सुविधा शिवभोजन केंद्राला ३ एप्रिल २० रोजी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अादिती तटकरे यांनी सदिच्छा भेट देवून महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रभाकर उभारे, माणगाव तहसिलदार प्रियंका आयरे, प्रांताधिकारी प्रशाली दिघावकर, नगराध्यक्ष योगीता चव्हाण, माजी नगराध्यक्ष आनंदशेठ यादव, मुख्याधिकारी राहूल इंगळे, पोलीस निरीक्षक रामदास इंगवले, उपनगराध्यक्ष दिलीप जाधव, आरोग्य सभापती रत्नाकर उभारे, नगरसेवक नितीन वाढवळ, समाजसेवक सचिन देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
माणगाव तालुक्यातील शहराचे मध्यवर्ती ठिकाण निजामपूर रोड येथे गोरगरीब, कष्टकरी वर्गातील लोकांसाठी शासनाने मंजूर केलेल्या या योजनेचा लाभ साई सुविधा शिवभोजन या केंद्राद्वारे तालुक्यातील जनतेला उपलब्ध होणार आहे. या थाळीमध्ये दोन चपात्या, एक वाटी भाजी, एक मूठ भात व एक वाटी वरण असे या शिवभोजन थाळीचे स्वरूप असून सदर थाळी फक्त पाच रुपयात दिली जाणार आहे. संपूर्ण देशासह महाराष्ट्रात पसरलेल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लागू केलेल्या लॉकडाऊन संचारबंदीच्या काळात या शिवभोजन थाळीचा गोरगरीब जनतेला चांगला लाभ घेता येणार आहे. ही शासनाने नाविण्यपूर्ण योजना राबविल्यामुळे माणगाव तालुक्यातील जनतेमधून समाधान व्यक्त होत आहे.