माणगावमध्ये कोव्हिड वॉरिअर ग्रुपची स्थापना, रेशन दुकानदारांवर ठेवणार करडी नजर
माणगांव (उत्तम तांबे) : कोरोना विषाणूच्या पाश्वभूमीवर माणगाव उपविभागात प्रत्येक गावामध्ये कोव्हिड वॉरिअर ग्रुप तयार केले आहेत. त्यामध्ये त्या गावातील तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, कोतवाल असे वर्कर तसेच अंगणवाडी सेविका, शिक्षक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते सामाविष्ट केलेले आहेत. त्यांना कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती प्रांताधिकारी प्रशाली दिघावकर यांनी दिली.
हे कर्मचारी व कार्यकर्ते परगावाहून नवीन आलेली माणसे शोधून त्यांची माहिती शासकीय यंत्रणेला देतील. कोरोना संशयास्पद आढळल्यास त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याची माहिती रूग्णालयात कळविली जाईल. घरोघरी जाऊन प्रत्येक व्यक्तीची नोंदणी करुन तो अहवाल तहसिलदार यांच्याकडे पाठविण्यात येईल. तसेच रेशन धान्य दुकानातील धान्य गरीबांना पोहचते किंवा नाही याकडे लक्ष देणार आहेत. सध्या हे काम युद्धपातळीवर सुरू आहे. याकामी हे कर्मचारी व हे वॉरिअर फार मेहनत घेत आहेत . या सर्व धडक कारवाईमुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.