"त्या" मृत व्यक्तीचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने नागोठणेकरांनी घेतला सुटकेचा श्वास 

मृताच्या कुटंबातील ११ जण मात्र होम क्वारंटाइन 


रायगड (किरण बाथम) :
नागोठण्यातील "त्या" ७० वर्षीय मृत व्यक्तीचा कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे आरोग्य यंत्रणेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.  त्यामुळे गेले काही दिवस भयभीत झालेल्या नागोठणेकरांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. याशिवाय या मृत व्यक्तीच्या परिसरातील पोलिस बंदोबस्तही आता काढण्यात आला आहे. त्यामुळे तेथील नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे.

नागोठण्यातील या मृताच्या कुटूंबातील ११ जणांचे रिपोर्ट याआधिच निगेटिव्ह आले आहेत. मात्र केवळ खबरदारी म्हणून या सर्वांना १४ दिवस होम क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय डाॅ. चेतन म्हात्रे यांनी दिली. नागोठण्यात दोन दिवसांपूर्वी पनवेलहून आलेल्या एका महिलेला तपासून होम क्वारंटाइन करण्यात आले असून याशिवाय नागोठण्यात व परिसरात कुणीही नवीन व्यक्ती येत असेल तर त्याने त्याची माहिती प्रशासनाला द्यावी तसेच येथे तपासणी करुन घेऊन स्वतःला होम क्वारंटाइन करावे असे आवाहनही डाॅ. चेतन म्हात्रे यांनी केले आहे.

नागोठण्यातील उर्दू हायस्कूल समोर असलेल्या नारायण साॅ मील परिसरातील वस्तीत राहणाऱ्या एका ७० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू ११ एप्रिल रोजी झाला होता.  या व्यक्तीला नागोठण्यातील एका खासगी दवाखान्यात तपासल्या नंतर रोहा येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. त्यानंतर या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. मात्र सध्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर असलेले वातावरण पाहता याप्रकरणी रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आवश्यक त्या सर्व सुचना शासकीय यंत्रणेला दिल्या होत्या. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वैद्यकिय अधिकारी डाॅ. सुधाकर मोरे यांनीही याप्रकरणी अधिक लक्ष घातले होते. त्यानंतर रोहाचे प्रांताधिकारी डाॅ. यशवंतराव माने, रोहाच्या तहसीलदार कविता जाधव, रोहा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव आदिंनी नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देवून येथील वैद्यकिय अधिकारी डाॅ. चेतन म्हात्रे यांना योग्य त्या सुचना दिल्या होत्या.

११ एप्रिलच्या सायंकाळ पासूनच नागोठण्यातील "त्या"  संबंधित परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता व या परिसरात नागरिकांच्या येण्या-जाण्यावर निर्बंध आणण्यात आले होते. नंतर मृत व्यक्तीच्या कुटुंबातील ११ जणांना पनवेल महानगरपालिकेच्या ग्रामविकास भवनातील प्रयोग शाळेत तपासणी करण्यासाठी पाठविण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने येथे सर्वांच्या मोफत तपासण्याही तेथे करण्यात आल्या होत्या. त्याचा अहवाल मंगळवारी (दि.१४) सकाळी प्राप्त झाला होता.

Popular posts from this blog