ज्ञानसूर्य विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करून त्यांची १२९ वी जयंती माणगांव तालुक्यातील घराघरात साजरी
बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : मंगळवार दिनांक १४ एप्रिल रोजी ज्ञानसूर्य विश्वरत्न महामानव, बोधिसत्व, परम पूज्य, भारतीय राज्यघटनेचे एकमेव शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२९ वी जयंती देशातील कोरोना व्हायरसच्या संक्रमण प्रतिबंधात्मक पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून शासनाच्या लाॅकडाऊन संचारबंदी नियमांचे तंतोतंत पालन करून माणगांव तालुक्यातील प्रत्येक घराघरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्य संसदेचे, भारतीय संविधानाचे वाचन करून आणि त्यांच्या राष्ट्रहितैषी विचारांचे पूजन करून ते आत्मसात करून त्यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करून अत्यंत शांततामय वातावरणात बुद्ध वंदना, त्रिशरण पंचशील आणि बौद्ध संस्कार विधी ग्रहण करून साजरी करण्यात आली.
१४ एप्रिल अर्थात विश्वरत्न, बोधिसत्व, महामानव, प्रज्ञासूर्य , प्रकांडपंडित, सिम्बॉल ऑफ नाॅलेज ज्ञानसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती दिवस दरवर्षी आपल्या भारतासह संपूर्ण जगात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतू या वर्षी आपल्या भारतासह संपूर्ण जगावर कोरोना व्हायरसचे महाभयंकर संकट कोसळले आहे. या महाभयंकर संसर्गजन्य विश्वव्यापी रोगाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी व या रोगाची संक्रमण साखळी खंडीत करून संपूर्ण जगातून याचा नायनाट करण्यासाठी भारतासह संपूर्ण जगात लाॅकडाऊन सुरू आहे. त्यामुळे कोरोना मुक्तीची ही वैश्विक लढाई लवकरात लवकर जिंकण्यासाठी आणि कोरोना व्हायरसचे समूळ उच्चाटन करण्यासाठी देश विदेशातील नागरिकांवर संचारबंदी लावण्यात आली आहे. या संबंधीच्या सर्व महत्वपूर्ण सूचना देशातील सर्व नागरिकांना देण्यात आलेल्या आहेत. या वर्षी १४ एप्रिल अर्थात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्व देशवासीयांनी कोरोना व्हायरसमुळे आपापल्या घरांतच साजरी करुन कोरोना मुक्तीच्या या राष्ट्र हिताच्या लढ्यात शासनाला सहकार्य करा असे शासनाने सांगितले आहे.
कोरोना मुक्तीच्या पार्श्वभूमीवरील शासनाने नागरिकांना दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करुन देशासह, राज्यातील व रायगड जिल्ह्यासह संपूर्ण माणगांव तालुक्यातील बौद्धजन पंचायत समिती, भारतीय बौद्ध महासभा सर्व तालुका आणि विभागीय शाखा, सर्व सामाजिक व धार्मिक संघटना आणि तमाम आंबेडकर वादी बहुजन समाजाने या वर्षी मंगळवार दिनांक १४ एप्रिल रोजी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२९ वी जयंती शासनाच्या लाॅकडाऊन संचारबंदीचे आणि सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करून आपापल्या घरात, आणि जवळच्या बुद्ध विहारात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून, दीपप्रज्वलन करून बुद्ध वंदना, त्रिशरण पंचशील व बौद्ध पुजापाठ संस्कार विधी ग्रहण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अफाट मौल्यवान ग्रंथ संपदेचे आणि भारतीय संविधानाचे वाचन करून त्यांचे राष्ट्रहितैषी महान विचार आत्मसात करून त्यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करून अत्यंत मंगलमय आणि शांततामय वातावरणात साजरी केली.