लॉकडाऊनच्या काळात माणगांव पोलीसांची धडक कारवाई
नियमांचे उल्लंघन करणारी २०० वाहने जप्त
माणगांव (प्रतिनिधी) :
देशभरात घोंगावणाऱ्या कोरोनारुपी वादळाला सामोरे जात असताना शासन व प्रशासन विविध लोकोपयोगी निर्णय घेत आहे. महाराष्ट्राच्या मुख्यंमंत्र्यांनी लॉकडाऊन ३० एप्रिल पर्यंत कायम केला आहे. राज्यात व देशात संचारबंदी लागू असताना नियमांचे उल्लंघन करण्याऱ्या नागरिंकावर व वाहन बंदी असताना अत्यावश्यक कामाखेरीज वाहन चालविणाऱ्या नागरिकांच्या मोटारसायकल व चार चाकी वाहने रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या माणगांव मध्ये मुंबई-गोवा हायवेवर जप्त केली जात आहेत.
माणगांव पोलीसांनी सुमारे २०० वाहने जप्त केली आहेत व वाहनचालकांना तसा मेमो देऊन ३० तारखेपर्यंत किंवा प्रशासनाचा पुढील आदेश मिळेपर्यंत जप्त केली असल्याचे समजते. ही कारवाई माणगांव पोलीस निरीक्षक रामदास इंगवले, सहाय्यक पोलीस निरीक्षक उद्धव सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली माणगांव वाहतूक पोलीस शाखेकडून करण्यात आली आहे.
प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या प्रत्येक नागरिकांवर सक्त कारवाई करण्याचे आदेश राज्य व केंद्रशासनाचे असल्याचे पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरीकांनी आरोग्याची काळजी घेऊन घरीच राहणेच योग्य आहे असेदेखील स्पष्ट केले आहे.