बोर्ली पंचतन परिसरातील बिअर शॉप/परमिट रुमवर रायगड पोलीसांचा छापा, 5 लाख 23 हजारांचा मुददेमाल जप्त
रायगड (किशोर केणी) :
सध्या कोरोना (कोव्हीड-19) विषाणू प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्याकरीता घोषित केलेल्या संचार बंदी काळात बिअर शॉप, वाईन शॉप परमिट रुम इत्यादींना सर्व प्रकारचे दारु विक्रीवर शासनाने निर्बंध घातले आहेत. याच संधीचा फायदा घेवून मौजे बोर्ली पंचतन तालुका श्रीवर्धन येथील साई श्री. बिअर शॉप व परमिट रुम येथे अनधिकृत दारू विक्री होत असल्याची माहीती पोलीस अधीक्षक श्री.अनिल पारस्कर यांना मिळाली. सदर माहितीची खातरजमा करुन असे गैरकृत्य करणाऱ्या इसमांना ताब्यात घेवून त्यांच्याविरुध्द कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश श्री. बापुराव पवार उप विभागीय पोलीस अधिकारी-श्रीवर्धन विभाग यांना दिले होते. त्यामुसार श्री. बापुराव पवार उप विभागीय पोलीस अधिकारी-श्रीवर्धन विभाग व दिघी सागरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री. शेलार व पथकाने बोर्ली पंचतन येथील साई श्री. बिअर शॉप व परमिट रूमवर छापा टाकून कारवाई केली. त्यावेळी सदर ठिकाणी ओंमकार महादेव रेळेकर वय-35, रा. बोर्ली पंचतन, ता. श्रीवर्धन जि. रायगड हा प्रत्यक्ष दारू विक्री करीत असताना मिळुन आला. त्यास ताब्यात घेवून त्याच्या प्रत्यक्ष ताबे-कब्जातून 5,23,268/- रुपये किमतीची वेगवेगळया कंपन्यांची बिअर, देशी-विदेशी दारु मिळन आली. आरोपी ओमकार महादेव रेळेकर याच्या विरुध्द दिघी सागरी पोलीस ठाणे कॉ.गु.रजि.नं.16/2020 महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1949 कलम 65(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हयाचा पुढील तपास दिघी-सागरी पोलीस करीत आहेत. सदरची छापा कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अनिल पारस्कर यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनानूसार व अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन गुंजाळ यांच्या अधिपत्याखाली श्री. बापुराव पवार उप विभागीय पोलीस अधिकारी-श्रीवर्धन विभाग व दिघी सागरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री. शेलार व पथकाने पार पाडली आहे.