जागतिक हवामान बदलाचा कोकण पट्ट्याला सर्वात जास्त फटका
यावर्षी ७० टक्क्यांहून अधिक परदेशी पाहुणे पक्षी कोंकणात पोहोचलेच नाही
माणगांव (महेश शेलार) :
महाराष्ट्रात सर्वत्रच येणाऱ्या परदेशी पक्ष्यांच्या स्थलांतरामध्ये बदल झाल्याचे चित्र दिसून आले आहे, सदर परिस्थितीला जगभरातील वेगवेगळ्या ठिकाणची महामारी व वातावरणातील तीव्र बदल कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे, कमीत कमी २० डिग्री ते जास्तीत जास्त ३८-४० डिग्री असे एकाच दिवसात तापमान जवळ-जवळ २० डिग्रीने कमी जास्त होत असल्याची तसेच ० % आर्द्रता फेब्रुवारी महिन्यातच कोंकणपट्यात नोंद झाली आहे, एकंदरीत सर्वच पर्यावरणाच्या दृष्टीने हि चिंतेची बाब ठरत आहे.
माणगांव परिसरात दर वर्षी हिवाळ्याच्या मोसमात अनेक परदेशी पाहुणे पक्षी दाखल होतात परंतु ह्या वर्षी त्यांच्या स्थलांतरामध्ये आश्चर्यकारक घट झाल्याचे दिसून आले आहे.
हिवाळ्याच्या सुरुवातीला काही पॅसेज मायग्रंट म्हणजेच लांब पल्याच्या स्थलांतरादरम्यान काही काळ विश्रांती घेण्यासाठी उतरणारे पक्षी असतात, यावर्षी त्यातील एकही पक्षी कोंकणातील ह्या पट्ट्यात नजरेस पडला नाही. कोंकणात स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांमध्ये मुख्यतः पाणथळ जागी स्थलांतर करणारे पक्षी असतात त्यामध्ये अनेक प्रकारची बदके आणि पाणथळीतल्या इतर पक्ष्यांचा समावेश असतो, दर वर्षी येथील धरण परिसर व सखल दलदलीचे प्रदेश मध्य हिवाळी मोसमा मध्येच ह्या पक्ष्यांच्या किलबिलाटाने गजबजलेले दिसून येतात परंतु या वर्षी हिवाळा संपून गेला तरी असे काहीच झाले नाही. स्थलांतरित पक्षी सोडून कोकणात येथील मूळच्या असलेल्या पक्ष्यांच्या संख्येमध्ये देखील मोठी घट दिसून येत आहे, ही मोठी चिंताजनक बाब आहे.
अतिवृष्टीमुळे गेल्या वर्षी येथील काही मूळच्या पक्ष्यांचे प्रजनन प्रक्रियाचक्र बिघडल्याचे दिसून आले होते, काही मोजके पक्षी सोडल्यास इतर सर्वसाधारण आढळून येणाऱ्या पक्ष्यांच्या संख्येमध्ये देखील कोंकणात मोठी घट दिसून येत आहे. एकतर सदर पक्ष्यांनी कोंकणपट्टा सोडून इतरत्र स्थानिक स्थलांतर केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गतवर्षी पुण्यामधील काही प्रदेशांमध्ये सर्वात जास्त पाऊस झाला व गेल्या काही दशकांमध्ये जेथे पाणी उपलब्ध नव्हते तेथे तळे साचली असल्याने मुबलक पाणीसाठा निर्माण झाला, तेथील प्रदेशात सर्वत्र पक्ष्यांच्या हालचालींची नोंद चांगल्या प्रमाणात होत आहे, त्यामुळे अंतर्देशीय स्थलांतरित होणाऱ्या पक्ष्यांचा मुख्य कल कोंकणपट्टा सोडून अधिक पूर्वेकडील भाग असल्याची शक्यतादेखील वर्तवली जात आहे.
हिवाळा तर गेला आता उन्हाळ्याचा मोसम सुरु झाला आहे, कोंकणात काही मोजके पक्षी उन्हाळी स्थलांतर देखील करतात, आता पर्यावरण अभ्यासकांचे लक्ष त्याकडे लागून आहे, खरंतर वातावरणात झालेले इतके मोठे बदल हे वन्यजीव व एकंदरीत सर्वच पर्यावरणाच्या भविष्यासाठी धोकादायक आहेत, हवामान बदलामुळे वाईट गेलेले एक वर्ष अथवा एक हंगाम पुढील इतर हंगामांसाठी अथवा अनेक वर्षांसाठी वाईट परिणामकारक ठरू शकते. निसर्गचक्रात सर्वच जीव आणि गोष्टी वेगवेगळ्या भूमिका पार पाडत असतात, निसर्गावर जीव व जीवांवर निसर्ग अवलंबून आहे त्यामुळे पर्यावरणात होणारे वाईट बदल हे सर्वांच्याच दृष्टीने वाईट परिणामकारक ठरणार हे अटळ सत्य आहे असे माणगांवचे पर्यावरण अभ्यासक शंतनू कुवेसकर यांनी या विपरित वातावरणातील बदलांविषयी आपले मत व्यक्त केले आहे.


Comments
Post a Comment