शासकीय वास्तू दुर्लक्षित, पोलीस बंगलाही उजाड
माणगांव (प्रतिनिधी) :-
माणगांवमधील पोलीस निरीक्षकाच्या बंगल्याची दुरवस्था. या बंगला परिसरात व कचेरी अवतीभवती अपघाती मोडलेली वाहने, जप्त केलेले पिंप (ड्रम) रचून ठेवलेले पाहायला मिळतात. एके काळी अतिशय दबदबा, प्रतिष्ठा असलेले कचेरी व पोलीस बंगला तसेच जुने तहसिल कार्यालय या शासकीय वास्तु दुर्लक्षित होतायत. चार वर्षांपूर्वी पर्यंत पोलीस निरीक्षक बंगल्यात राहत होते, आता मात्र बंगला रिकामी पडला आहे. तसेच कचेरीतील जुने तहसिल कार्यालयही नवीन जागेत गेले आहे. शासनामार्फत त्याकाळी नियोजन, अनेक कठीण प्रक्रियेनंतर निधीची तरतूद करुन मंजुरी मिळवून या शासकीय वास्तुंची निर्मिती केली गेली. माणगांव पोलीस ठाण्याची म्हणजेच कचेरीचे संपूर्ण बांधकाम ब्रिटीश कालीन आहे.
याच परिसरात स्वातंत्र्यपूर्व काळात व्हिक्टोरीया क्राॅस पदक प्राप्त; वीर यशवंतराव घाडगेंचा पुतळा देखील आहे. माणगांव पोलीस लाईन ही जुनीच होती. या ठिकाणी दुरुस्ती होऊन सुधारणा केली गेली आहे. तसेच नव्याने काही पोलीस वसाहत, ईमारती येथेच बांधल्या गेल्या आहेत. परंतु त्यांचीही अवस्था खराब व रंगहीन झाली आहे. पोलीस लाईन पाठीमागील परिसरात अस्वच्छता आहे. याच लाईनींसमोर पोलीस परेड ग्राउंड आहे. केवळ १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी ला येथे लक्ष दिले जाते. खरं तर सुंदर हिरवळ आणि चारी बाजूला झाडं लावून हा परिसर सुशोभित करावा. कामाच्या तणावाने थकलेल्या पोलीस बांधवांना मनशांती मिळेल अशा पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात. अशी जनतेची मागणी आहे.
शासनाच्या संबंधित विभागाने या ठिकाणी लक्ष घालावे. या परिसराची स्वच्छता, देखभाल, दुरुस्ती, डागडुजी वेळच्या वेळी करणे अत्यंत महत्वाचे आहे. परंतु जोपर्यंत त्या संपूर्ण मोडकळीस येत नाहीत व कोणी तक्रार करीत नाही तोपर्यंत दुर्लक्ष केले जाते. या ठिकाणी भरपूर शासकीय मोकळी जागा उपलब्ध आहे.
पण शासनाच्या लालफितीत काम अडते. शहराच्या सौंदर्यात भर घालणार्या या परिसराची दुर्दशा कोण थांबविणार ? असा सवाल उपस्थित केला जातोय. वीर यशवंत घाडगे स्मारक होणार आहे असे घाडगे जयंती उत्सवात दरवर्षी ऐकावयास मिळते पण कधी ? असा सवालही उपस्थित केला जातोय. संबंधित प्रशासनाने याठिकाणी लक्ष वेधावे अशी बिकट अवस्था आहे.