पेणमध्ये जमाव बंदीचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर गुन्हे दाखल
पेण : ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जमाव बंदी व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश असतानाही दुकान चालू ठेवत लोकांची गर्दी जमवून पदार्थ विक्री करणार्या पेणमधील दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
परशुराम रंगास्वामी, सुर्या सुरेश व कवि यारास गुरूनाथ (रा. युवराज बिल्डिंग, शिवाजी चौक-पेण) अशी गुन्हा दाखल झालेल्या दुकानदारांची नावे आहेत. या तिघांनी त्यांच्या साई बालाजी हॉट चिप्स नावाचे दुकान चालू ठेवले होते. दि. २३ मार्च रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास तेथे लोकांची गर्दी जमली होती व या दुकानातील वेफर्स आणि नमकीन पदार्थ विक्री सुरु होती. बंदोबस्तावर असलेले पोलीस शिपाई दिनकर वाघ यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर या दुकानदारांवर कारवाई करण्यात आली.
या दुकानदारांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशांचे उल्लंघन केले असून, संसर्गजन्य आजार पसरेल असे हयगयीचे, घातक कृत्य केले आहे. तसेच राष्ट्रीय आपती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये दिलेले आदेश पाळले नाही म्हणून त्यांच्यावर पेण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.