रा. जि. प. शाळा उसर्ली खुर्द येथे बालबाजार
कृतीयुक्त शिक्षणचा आनंददायी अनुभव
पनवेल (प्रतिनिधी) :-
जागतिक गणित दिनाचे निमित्त साधून रायगड जिल्हा परिषद शाळा उसर्ली खुर्द येथे बाल बाजाराचे आयोजन करण्यात आले. गणितीय संकल्पना विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने समजाव्यात, बेरीज-वजाबाकी, नाणी व नोटा यांची ओळख, खरेदी-विक्री नफा-तोटा, हिशोबाची मांडणी, सुटे-बंदे पैसे, व्यावसायिक कौशल्य, अर्थात विक्री कौशल्य अशा अनेक संकल्पनांच्या पूर्तीसाठी एक नाविन्यपूर्ण उपक्रम अर्थात 'बालबाजार' आयोजित करण्यात आला.
दुकानांच्या मांडणी मधून भौमितिक आकार आणि संकल्पना यांचे सुद्धा महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात काळुंद्रे केंद्रप्रमुख सौ. अंकिता हुद्दार यांचे मार्गदर्शन लाभले.
उसर्ली खुर्द शाळेतील या बाल बाजाराचे उद्घाटन ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. मनीषा वाघमारे यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी उपसरपंच प्रसाद भगत, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश भगत, उपाध्यक्ष अस्मिता घाडगे, त्याचबरोबर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक श्री. ढेरे, तलाठी श्री. घरत हे या बाल बाजाराच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्याचप्रमाणे नरेश पाटील, श्री. कोळी सर यांनी बालबाजाराला भेट देऊन मुलांना प्रोत्साहन दिले तसेच बाजार फिरून विद्यार्थ्यांशी ़ संवाद साधला आणि खरेदी सुद्धा केली. या शाळेतील विद्यार्थ्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. कारण अगदी दोन दिवसांच्या सूचनेमध्ये विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी खूप छान तयारी केली होती आणि स्वतःच्या दुकानांची व्यवस्थित मांडणी, सामानाची मांडणी, आलेल्या गिर्हाईकांना व्यवस्थितपणे स्वच्छ आणि चांगल्या पद्धतीने खाऊचे पदार्थ देणे, भाजीपाला व्यवस्थित देणे, त्यांच्याशी सुसंवाद साधणे, पैशांचा व्यवहार अचूक करणे, सांभाळणे आणि आलेल्या पैशाची व्यवस्थित नोंद करणे. हे सर्व मुलं सहज करत होती. इयत्ता पहिली ते पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. ही विशेष कौतुकाची गोष्ट आहे. कौतुकाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे अगदी वडापाव, पाणीपुरी, डाळभजी, घावणे, भाकरी, लस्सी, कलिंगड फोड, चायनीज भेळ, साधी भेळ, मेदुवडे, घावणे चटणी, चणे-वाटाणे, शालेय उपयोगी वस्तू, वह्या, पेन, पेन्सिल, खोडरबर, शॉपनर, रंगीबेरंगी मुखवटे, शुभेच्छापत्रे होम मेड नानकटाई, चकली, बिस्कीट, चिवडा, लिंबू सरबत, कोकम सरबत, आईस्क्रीम यांसारख्या अनेक प्रकारच्या खाऊच्या पदार्थांची तर अक्षरशः रेलचेलच होती.
याचबरोबर विद्यार्थ्यांनी वेगवेगळे रेडिमेट खाऊ प्रकार सुद्धा येथे आणले होते. चॉकलेट, चिप्स* कुल्फी, आईस्क्रीम, चोकोबार विशेष म्हणजे याच बरोबर विद्यार्थ्यांनी आजूबाजूच्या गावातील मळ्यातून आणि विक्रीसाठी आणलेला अगदी ताज्या सेंद्रिय शेतीतील ताजी भाजी, पालेभाज्या आणि फळ भाज्या देखील विक्रीसाठी आणल्या होत्या. त्याच बरोबर फळे सुद्धा विक्रीसाठी आणली होती. त्याचबरोबर ज्वेलरी मध्ये कानातले, नाकातले, गळ्यातले दागिने यांसारखे साहित्य होते. साड्या, फॉल यांसारख्या वस्तू सुद्धा विद्यार्थ्यांनी विकायला आणल्या.
अतिशय चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला आणि त्यांनी खरेदी-विक्रीचा आनंद तर मिळवला आणि त्याशिवाय एक गणितीय संकल्पना अगदी हसत खेळत विद्यार्थ्यांमध्ये रुजल्या. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी, शिक्षक वृंद, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती उसर्लीखुर्द, सर्व मान्यवर, ग्रामस्थ, पालक, बाल विक्रेते विद्यार्थी यांनी खूप छान मेहनत घेऊन दिवसभर अतिशय आनंददायी आणि उत्साही पद्धतीने हा बाल बाजार यशस्वी केला आणि खरेदी-विक्री कौशल्याचा आनंद घेतला आणि त्याबरोबर नफा कमावला. विशेष म्हणजे हा झालेला नफा बचत बँकेत ठेवू आणि नंतर शैक्षणिक सहली किंवा साहित्यासाठी वापरू असे विद्यार्थी म्हणाले.
यासाठी त्यांना पालकांची पण अतिशय मोलाची साथ लाभली. हा बालबाजार यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी उसर्लीखुर्द शाळेच्या मुध्यापक सौ. प्रगती प्रमोद म्हात्रे, शिक्षकवृंद सुनीता काळे, सौ. चित्ररेखा रवींद्रनाथ जाधव, सौ. वैशाली प्रशांत अंबुर्ले, सारीका बाळकृष्ण घाडगे, याचबरोबर अांगणवाडी सेविका, ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले.