माणगांव पोलीसांवर प्राणघातक हल्ला; सहाय्यक पोलीस निरीक्षकासह पोलीस चालक गंभीर जखमी, माणगांवमध्ये खळबळ





माणगांव (उत्तम तांबे) :
माणगांव तालुक्यातील इंदापूर येथील पाणसई व वाढवण गावाच्या हद्दीमध्ये माणगांव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कावळे आणि पोलीस गाडीचे चालक उद्धव टेकाळे यांच्यावर अज्ञातांनी प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केले असून दोघांच्याही हातापायाला गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यानंतर हल्लेखोरांनी तेथुन पोबारा केला. जखमी पोलिसांना ताबडतोब उपजिल्हा रुग्णालय माणगांव येथे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.  बुधवार दि. १८ मार्च रोजी पहाटे ३ वा. च्या सुमारास हा प्राणघातक हल्ला झाला.


याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कावळे व चालक उद्धव टेकाळे हे दोघे माणगांव विभागीय गस्त करीत रात्री २:३० वा. च्या  सुमारास इंदापूर येथे आले असता २ इसमांनी  माहिती दिली की, त्यांच्याकडील मॅक्सिमो वाहनाचा दुसऱ्या वाहनाशी किरकोळ अपघात झाला आहे. या कारणावरून काही अज्ञात व्यक्तींनी त्यांना मारहाण करून त्यांचे वाहन घेऊन वाढवण गावाकडे गेले आहेत. अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली. त्यामुळे तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कावळे व वाहन चालक उद्धव टेकाळे हे तातडीने वाढवण गावाच्या दिशेने गेले. ज्या ठिकाणी मॅक्सिमो वाहन घेऊन गेले होते. त्या घरासमोर जाऊन आवाज देऊन त्यांना झोपेतून उठविले असता त्या घरातून ३ पुरुष व १ महिला बाहेर आली. त्यानंतर या दोन पोलिसांशी जोरदार वाद घालून भांडण केले. त्यानंतर काही कळण्याच्या आत पोलीस व त्यांच्यामध्ये झटापट झाली. या झटापटीत सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कावळे यांच्या पायावर जोरदार लाथेचा प्रहार केल्याने ते जागीच कळवळत बसले. त्यानंतर त्यांच्या डोक्यावर लोखंडी सलईचा तडाखा मारल्याने ते जखमी झाले. त्यांच्या डोक्यातून भळाभळा रक्त वाहत होते. या हाणामारीत त्यांचा पायाचा हाड मोडले आहे. या चकमकीत वाहन चालक उद्धव टेकाळे यांच्यावर सुद्धा प्राणघातक हल्ला झाला. त्यांच्या डाव्या पायावर जोरदारपणे फावड्याचा प्रहार केल्याने मोठी जखम झाली असून त्यांच्या पायावर टाके घालण्यात आले आहेत.


अशा बिकट परिस्थितीत सागर कावळे यांना चालता येत नव्हते. तरीही जीव एकवटून धीरोधक्तपणे जमिनीवर सरसकट रक्तबंबाळ व जखमी अवस्थेत पोलीस गाडी जवळ पोहोचले. त्यानंतर त्यांनी लगेचच वायरलेस यंत्रणेवरून सदर प्राणघातक हल्ल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दिली. दरम्यान या हल्ल्यापूर्वी आम्ही इंदापूर जवळील वाढवण येथे अपघाताची माहिती घेण्यास जात आहोत असे सांगितले होते. तसेच येताना अधिक पोलीस यंत्रणा आणावी असे सांगितले होते. कारण आम्ही दोघेच आहोत असे सांगितले. त्यामुळे अधिक पोलिसांची कुमक १० ते १५ मिनिटात घटनास्थळी दाखल झाली. या दरम्यान हे हल्लेखोर पसार झाले होते. या झटापटीत हल्लेखोरांकडील १ मोबाईल पोलीस तपासात सापडला आहे. त्यामुळे पसार झालेली आरोपी लकवरच सापडतील असा विश्वास पोलीस उपविभागीय अधिकारी शशिकीरण काशीद आणि पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांनी सांगितले.
या हल्ल्यानंतर पोलिसांनी अधिक शोध घेतला असता हल्लेखोरांकडून २ धारदार तलवारी व विदेशी दारूचा साठा त्यांच्या घरामध्ये सापडला. त्यानंतर माणगांव पोलीस अधिक दक्षता घेत सतर्क झाले. त्यांनी संपूर्ण माणगांव तालुक्यासह रायगड जिल्ह्यात नाकाबंदी केली आहे. या हल्लेखोरांना लवकरच अटक करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले. पोलीसांवरच जीवघेणा हल्ला झाल्याने माणगांव तालुक्यासह रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. माणगांव पोलिसांवर इतिहासमध्ये हा पहिलाच प्राणघातक हल्ला झाल्याने भीतीची वातावरण पसरलेले आहे. या घटनेमध्ये पोलिस व अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्या बाबत भा.दं.वि. कलम ३०७, ३५३, ३२७, ३३२, ३३३, ५०४, ३४ नुसार माणगांव पोलीस ठाणे येथे नोंद करण्यात आली आहे.

Comments

Popular posts from this blog