मालसई रस्त्याचे काम फक्त कागदावरच सुरू, कार्यारंभ आदेशानंतर देखील ३ महिने काम रखडलेले
वादग्रस्त 'अॅशकॉन' कंपनीमुळे रस्त्यांची लागणार वाट..!
रोहा (समीर बामुगडे) : रोहा शहराजवळच असलेल्या सोनगाव, मालसई रस्त्यांची कामे केवळ देखाव्यापुरतीच होत असून या कामांद्वारे ग्रामस्थांची दिशाभूल केली जाण्याची भीती जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. कारण कार्यारंभ आदेश मिळून देखील कोणतेही काम झालेले नसताना उत्कृष्ठ कामाचा दावा केला जात आहे.
सदरच्या मालसई रस्त्याचे काम प्रधानमंत्री/मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत पूर्ण होणार आहेत. परंतु या रस्त्याचे काम अॅशकॉन कंपनीला मिळालेले असून या कंपनीच्या कार्यपद्धतीबद्दल मोठे वादंग यापूर्वीही निर्माण झालेले आहेत, असे मत एका अभियंत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर व्यक्त केले. त्यामुळे नियमितपणे अॅशकॉन कंपनी निकृष्ठ कामे करून या रस्त्याची देखील वाट लावणार याबाबत शंकाच नाही.!
गेली अनेक वर्षे या रस्त्याची आवश्यकता असल्याने या कामाला प्रशासनाने गांभीर्याने घेतले. पिंगळसई, मढाली, वांदोली, धामणसई, सोनगाव, मुठवली, मालसई अशी गावे या परिसरात आहेत. रस्ते नसल्यामुळे या गावांत एसटीची सुविधा मिळणे देखील दुराप्रस्त बनलेले आहे. यापूर्वी या परिसरात झालेले रस्ते सोनगाव व मालसई ग्रामस्थांना 'दुरून डोंगर साजरे' असे असल्याने रोहा शहराकडे जाणारा रस्ता नव्याने तयार व्हावा यासाठी ग्रामस्थ प्रयत्न करीत होते. मालसई रस्त्याची लांबी अडीच किमी आहे. या रस्त्यासाठी १ कोटी ४५ लाख रूपये खर्च होणार आहे. तसेच सोनगावला जोडणाऱ्या रस्त्याचा यामध्ये समावेश झालेला आहे. तो रस्ता पावणेदोन किमी लांबीचा आहे. त्यासाठी देखील १ कोटी खर्च होऊ शकेल. रस्त्याच्या नियोजनात एक छोटा पूल, तसेच १३ ते १४ मोऱ्यांचे बांधकाम होणार आहे.
परंतु येथे रस्त्यांचे अर्धेमुर्धे काम झालेले दिसत आहे. इथे होत असलेल्या मोऱ्यांच्या कामांची पाहणी केली तर केवळ पाईप आणि त्यावर माती आणि दगडांचा भराव करून सुमार दर्जाचे काम केले जात आहे. अशा कामातील या मोऱ्या कोणत्याही प्रकारे मजबूत व सुरक्षित नाहीत. परंतु अॅशकॉन कंपनी स्वतःच्याच फायद्याकरिता नेहमीप्रमाणेच पाट्या टाकण्याचे काम करीत आहे. अधिकारी आणि ठेकेदारांची 'मलिदा' खाण्याची ही युती मुख्यमंत्री/प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेला सुरूंग लावते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
प्रशासनाने तातडीने याप्रकरणी गांभीर्याने दखल घेऊन ठेकेदार त्वरित बदलावा, अथवा कर्तव्यकठोर अधिकारी या कामावर नेमून ग्रामस्थांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी या परिसरातील संतप्त नागरिकांकडून केली जात आहे.