कोकणातील आंबा बागायतदारांना दिलासा


माणगांव (इंद्रनिल पाटील) : 
आंबा बागायतदार, व्यावसायिकांना दिलासा मिळाला असून आंबा वाहतुकीला जिल्हाधिकार्‍यांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे ही वाहतूक सुरू होणार आहे. त्यासाठी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून पास 1 आठवड्याकरता दिला जाणार आहे. वाशी (नवी मुंबई) बाजार समितीकडूनही प्रतिदिन दोनशे ट्रक आंबा कोकणातून विकत घेण्याची तयारी दर्शविली असल्याची माहिती भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी दिली.

कोरोनाच्या  पार्श्वभूमीवर देशामध्ये लॉक डाऊन झाले. संचार बंदी लागू झाली आणि दळणवळणाला मर्यादा आल्या. अनेक शंका आणि अडचणींचा सामना करावा लागला. त्याचवेळी आंबा हे फळ तयार होण्याचे हाच कालावधी असताना जिल्हा बंदी झाल्यानंतर तयार आंबा बाहेर कसा पाठवायचा या चिंतेने आंबा उत्पादक, बागायतदार धास्तवले. यंदाच्या मोसमात आंब्याच्या उत्पन्नाला ग्रहणच लागले. या बागांवर अनेकांनी लाखो रुपये खर्च केले आहेत. कोरोनामुळे देशात संचारबंदी लागू झाल्याने या तयार आंब्याचे करायचे काय हा प्रश्न बागायतदारांना पडला होता.


या संदर्भात आमदार लाड यांनी पुढाकार घेतला होता.  रत्नागिरी, सिंधुदुर्गमधून आंबा मुंबईकडे रवाना झाला तर त्याची विक्री करण्यासाठी वाशी बाजार समितीत यंत्रणा आवश्यक होती. त्यासंदर्भात वाशीमध्ये महत्त्वाची बैठक झाली. यावेळी आमदार प्रसाद लाड यांच्यासह पोलिस महानिरीक्षक, बाजार समितीचे आयुक्त, पणनचे अधिकारी यांच्यासह व्यापारी उपस्थित होते. त्यामध्ये नाशिवंत फळांच्या वाहतुकीला परवानगी देण्याव चर्चा झाली. कोकणातील हापूस मोठ्याप्रमाणात तयार होत आहे. तो वाया जाऊन बागायतदारांचा फटका बसू नये यासाठी वाशीमध्ये हापूस स्विकारण्याची तयारी दर्शविली आहे. प्रतिदिन दोनशे ट्रक वाशीत घेण्याची तयारीही दर्शविली आहे. जिल्हाधिकार्‍यांकडून तसे पास घेऊन ही वाहतूक करण्यात येणार असल्याचे लाड यांनी सांगितले आहे.

आंबा बागायतदारांनी येथे साधा संपर्क परवानगीचा अर्ज व्हॉट्सऍपवरही करता येणार आहे. त्यांना वाहतुकीसाठी डिजिटल परवानगीही देण्याची तयारी प्रशासनाकडून करण्यात आली आहे. आंबा बागायतदार यांनी आपला गाडी नंबर, कोठून कोठे जाणार, ड्रायव्हरचे नाव, लायसेन्स आदी माहिती अर्जामध्ये भरणे आवश्यक्य आहे. अडचण आल्यास आमदार प्रसाद लाड 9821388888, अनिकेत पटवर्धन 9765926310 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

Popular posts from this blog