रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान, तयार झालेली पिके, भाजीपाला सडून जाण्याच्या मार्गावर
माणगांव (सचिन पवार) :
कोरोना व्हायरसने सध्या सर्वत्र थैमान घातलेले असून देशामध्ये लॉकडाऊन झाले. संचारबंदी लागू झाली आणि दळणवळणाला मर्यादा आल्या. या कालावधीत रायगड जिल्ह्यात तयार झालेली पिके व भाजीपाला बाहेर कसा पाठवायचा? खरेदी विक्री कशी होईल? या चिंतेने येथील शेतकरी धास्तावले आहेत. येथील पिकांवर शेतकऱ्यांनी लाखो रूपये खर्च केलेले आहेत. परंतु सध्या तयार झालेल्या भाजीपाल्याचे व पिकांचे करायचे काय? असा प्रश्न येथील शेतकऱ्यांसमोर उभा आहे.
गेली तीन महिने काबाडकष्ट करून पिकविलेली पिके, भाजीपाला कोरोना व्हायरसमुळे जाग्यावरच पडून आहे व तो सडून जाण्याच्या मार्गावर आहे. येथील शेतकरी मेटाकुटीला आलेले असून सर्व स्तरांतून त्यास दिलासा आणि सहानुभूतीची आवश्यकता आहे. पुढे येणारे शैक्षणिक खर्च, शाळांचे अॅडमिशन अर्थात, आपली मुले शाळेत कशी जातील या विवंचनेत सुद्धा शेतकरी सापडलेले आहेत आणि म्हणूनच त्यांना दिलासा देण्यासाठी प्रत्यक्ष शेतात जाऊन 'किसान क्रांती संघटना, महाराष्ट्र राज्य' चे रायगड जिल्हा अध्यक्ष संतोष पवार यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत शासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.