कायद्यापेक्षा मुलीच्या जन्माचं स्वागत व्हायला पाहिजे - माधवी धारिया

रोहे (समीर बामुगडे) :-  कायदे हे महिलांच्या संरक्षणासाठीच आहेत. पण जोपर्यंत मुलीच्या जन्माचं स्वागत होत नाही तोपर्यंत हे कायदे निष्प्रभ ठरतील. मुलींबरोबर मुलांवर सुद्धा संस्कार करा व त्यांना मुलींकडे बघण्याची नवदृष्टी द्या असा मौलिक सल्ला महिला सुरक्षा कायदेविषयक मार्गदर्शन करताना दूरदर्शनवरील प्रसिद्ध कायदेविषयक मार्गदर्शक अॅड. माधवी धारिया यांनी उपस्थित महिलांना दिला.

अनुभव प्रतिष्ठान ट्रस्ट संस्थेच्या वतीने बिरवाडी येथील गुजराथी हाॅल येथे झालेल्या महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर बिरवाडी ग्रामपंचायत सदस्या शीतल गोगावले, अॅड. माधवी धारिया, सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी जाधव, मोनिका भुतकर, पोलीस निरीक्षक पंकज गिरी,  समन्वयक नारायण पाटील, कांचन कदम, ज्योती टेकाळकर आदी मान्यवर उपस्थित होते. महिला सुरक्षा व संरक्षण कायदेविषयक मार्गदर्शन करताना अॅड. धारिया यांनी सतीप्रतिबंध, द्विभार्या प्रतिबंधक, बालविवाह प्रतिबंध, हुंडा प्रतिबंधक घटस्फोटाचा कायदा, लैंगिक अत्याचार प्रतिबंधक, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक, मानवी तस्करी प्रतिबंधक, पोस्को व गर्भलिंग चिकीत्सा प्रतिबंधक कायद्याविषयी सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व ज्योती टेकाळकर यांच्या स्वागतगीताने झाली. त्यानंतर प्रास्ताविकेत नारायण पाटील यांनी संस्थेची भूमिका व महिलांविषयी शासनाचे धोरण आणि विविध कायदे आणि त्यांच्या सबलीकरणासाठी करीत असलेल्या प्रयत्नांविषयी माहिती दिली. विविध मनोगतात शीतल गोगावले यांनी महिला बचत गटांसाठी गावपातळीवर थेट बाजारपेठा उपलब्ध करणे आवश्यक असल्याचे सांगितले तर मोनिका भुतकर यांनी महिलांनी स्वकर्तृत्वावर पुढे यायला पाहिजे यासाठी त्यांनी स्वतवर ओढवलेला प्रसंग विषद केला. महाड एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक यांनी उपस्थित महिलांना पोलीस तुमच्यासाठी सदैव तत्पर असल्याचे सांगितले तर अश्विनी जाधव यांनी महिलांसाठी विविध लघुउद्योगांविषयी माहिती दिली. शेवटी ट्रस्टचे अध्यक्ष दिलीप आखाडे यांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमादरम्यान महिलांनी प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन केले होते. या महिला मेळाव्याकरता बिरवाडी, एमआयडीसी परीसरातील सात ते आठ ग्रामपंचायतीतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिला बचत गटांनी विविध उत्पादनाचे विविध स्टाॅलमधून यावेळी विक्री करण्यात आली.

Popular posts from this blog