मतीमंद अल्पवयीन मुलीवर ५५ वर्षीय नाराधमाने केले अतिप्रसंग!
पीडितेच्या कुटूंबियांची न्यायासाठी वणवण!
रोहा - अष्टमीत प्रक्षोभ ; रोहेकर संतप्त होताच आठवडयानंतर गुन्हा दाखल
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घेतली दखल, तपास स्वतंत्रपणे महिला पोलीस अधिकाऱ्यांकडे
रोहा (किरण बाथम) :- रोहा अष्टमी येथील एका १० वर्षीय मतीमंद अल्पवयीन मुलीवर 55 वर्षीय नराधमाने अतिप्रसंग केल्याचा प्रकार सुमारे आठ दिवसांपूर्वी घडला. या घटनेनंतर पीडित मुलीच्या कुटूंबियांनी पोलिसांत जाऊनही कोणत्याही स्वरूपाची कारवाई मात्र झाली नाही. न्यायासाठी हे कुटुंब वणवण फिरत असल्याचे पाहून रोहा -अष्टमीत प्रक्षोभ निर्माण झाले. शुक्रवारी रोहेकरांनी एकत्र येत पोलिस ठाण्यात जाऊन संताप व्यक्त केल्याने आठवडयानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर यांनी दखल घेत या प्रकरणाचा तपास स्वतंत्रपणे महिला पोलीस अधिकाऱ्यांकडे दिला आहे.
पेण येथून पोटापाण्यासाठी अष्टमी गावात आलेल्या सामान्य कुटुंबावर मोठे संकट कोसळले. त्यांच्या मतिमंद लहानग्या मुलीवर मागील आठवडयाच्या शुक्रवारी दुपारी अतिप्रसंग ओढावला. निर्जन भागात संबधीत मुलीला बोलावून गावातील एका प्रौढ व्यक्तीने अश्लिल चाळे केल्याची गंभीर घटना घडली. हे सर्व धक्कादायक प्रकरण लक्षात येताच आई वडिलांनी पोलीसांकडे धाव घेतली. सर्व प्रकरण विस्तृत केले. मात्र संबधीत पोलीसांनी कुटूंबाची तक्रार गांभीर्याने घेतली नाही. पीडितेच्या कुटुंबियांनी तक्रार दाखल करू नये असेही प्रयत्न झाले. मुलीच्या आई कडून हवे तसे पत्र लिहून घेतले गेले. मुलीची वैद्यकीय तपासणीही सरकारी रुग्णालयात न करता खाजगी दवाखन्यात केली गेली. मुलीला खूप वेदना होत असल्याचे तिची आई व्याकूळ होऊन सांगत असतानाही पोलीसांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले. पीडित मुलीच्या कुटुंबियांनी गाव सोडुन जावे असे त्यांना धमकावण्यात ही आले. पीडित मुलीचे कुटूंबिय स्थानिक नसल्यामुळे त्यांना धमकावण्यात येत असल्याने शुक्रवारी मुलीच्या आईने स्वतः पोलीस अधिकारी आणि रोहेकर नागरिकांसमक्ष सांगितले.
मुलगी मतीमंद असल्याने फायदा उठविण्यात आला, खाजगी रूग्णालयातील महिला प्रसुती तज्ञांनीही तपासणी अहवाल पोलीसांना वेळेत दिले नाही. मूळात पोलीसांनीच अहवाल न मागता प्रकरणाकडे दुर्लक्ष केले. अखेर या प्रकरणाला आठवड्यानंतर शुक्रवारी वाचा फुटली. रोहा पोलीस ठाण्यात सबंध अष्टमी रोहेकर ग्रामस्थ संतप्त झाले. रोहा अष्टमीत प्रक्षोभ उडाला. शहरातील सर्व पक्षीय नेते, ग्रामस्थ पत्रकार आणि तरुणांनी शुक्रवारी रोहा पोलीस ठाण्यात धाव घेतली. हे प्रकरण सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने पोलीसांवर दबाव वाढला. पीडित कुटूबांची तक्रार का घेतली गेली नाही असा प्रश्न संबंध रोहेकर विचारू लागले. डाॅ. खैरकर यांनी उशिरा दिलेल्या रिपोर्टमध्येही धक्कादायक उल्लेख आले. याची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर यांनी दखल घेत प्रकरणाची चौकशी उपविभागीय पोलिस अधिकारी अलिबाग सोनल कदम यांचेकडे दिली. रोहा पोलिसांत आरोपी विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
प्रतिक्रिया
आरोपीला पाठीशी घालणार नाही, या प्रकरणात दोषी कर्मचाऱ्यांच्या कसूरीचा अहवाल वरिष्ठांना पाठविण्यात येईल. आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली आहे
- नामदेव बंडगर, पोलीस निरिक्षक
चाईल्ड हेल्पलाईन व पोलीसांनी वेळीच दखल घेतली असती तर प्रकरण हाताबाहेर गेले नसते, पोलीस ठाण्याची प्रतिमाही मलीन झाली नसती.
- समीक्षा बामणे, नगरसेविका
झालेला प्रकार निदंनीय आहे. या घटनेचा निषेध करतो, पोलीसांनी याप्रकरणी कठोरात कठोर कारवाई करावी, आम्ही सर्व रोहेकर पीडितेच्या कुटूंबियासोबत आहोत,
- संतोष पोटफोडे, नगराध्यक्ष रोहा