वजन कमी करण्याच्या गोळया घेतल्यानंतर ठाण्यात तरुणीचा मृत्यू 

ठाणे (न्यूज २४ तास वेब टीम) :-

वजन कमी करणाऱ्या गोळया घेतल्यानंतर काही तासातच ठाण्यामध्ये एका तरुण मुलीचा मृत्यू झाला. मेघना देवगडकर (२२) असे मृत मुलीचे नाव आहे. पेशाने ती नृत्यांगना होती तसेच जीममध्ये ट्रेनर म्हणूनही काम करायची. वजन कमी करण्यासाठी ज्या गोळया घेण्यावर बंदी होती, त्याच गोळया मेघनाने घेतल्या. मुंबई मिररने हे वृत्त दिले आहे.

गोळया घेतल्यानंतर किती तासात मृत्यू झाला? 

जीममध्ये वर्कआऊटला निघण्याआधी तिने या गोळया घेतल्या. अलीकडेच ती इथे ट्रेनर म्हणून रुजू झाली होती. गोळया घेतल्यानंतर तिला उलटयांचा त्रास सुरु झाला. तिला आधी घराजवळच्या डॉक्टरकडे नेले. तिथून लाइफलाइन हॉस्पिटल आणि पुन्हा तिथून सायन रुग्णालयात हलवले. तिला आयसीयूमध्ये दाखल केले होते. पण मेघनाचा कार्डीअक अरेस्टने मृत्यू झाला. गोळया घेतल्यानंतर पंधरा तासांच्या आत तिचा मृत्यू झाला.

गोळी घेताच शरीरामध्ये नेमके काय बदल झाले? 

बंदी घातलेल्या गोळया घेतल्यानंतर मेघनाला हायपरथरमियाचा त्रास सुरु झाला. तिच्या शरीरातील तापमान सामान्यपेक्षा जास्त वाढले. रक्तदाब आणि ह्दयाचे ठोके वाढले असे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे कार्डीअक अरेस्टने तिचा मृत्यू झाला.या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात अपघात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. एफडीएला अहवाल पाठवण्यात आला आहे. मेघनाला बंदी घातलेल्या गोळया कशा मिळाल्या त्या अंगाने आता तपास सुरु आहे.

Popular posts from this blog