तरुणांनी "संवादक" होऊन संविधानातील मूल्ये अंतिम माणसापर्यंत पोहोचवावी - मुक्ता दाभोळकर 


रोहे (समीर बामुगडे) :-
तरुणांनी संविधानाचे "संवादक" होऊन खेड्यापाड्यातील अंतिम माणसापर्यंत भारतीय संविधानातील मूल्ये पोहोचविल्याशिवाय देशातील असंविधानिक प्रक्रियांना आळा बसणार नसल्याचे मत सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता दाभोळकर यांनी व्यक्त केले आहे. कुष्ठरोग निवारण समिती शांतिवंन येथील "संविधान प्रचारक शिबिरात" मुक्ता दाभोळकर बोलत होत्या. 

संविधान संवर्धन आणि साक्षरता अभियानांतर्गत राष्ट्र सेवा दल रायगड, मिशन माणूस "key" संविधान संवर्धन समिती, कुष्ठरोग निवारण समिती शांतीवन, डॉ. पी. व्ही. मंडलिक ट्रस्ट, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ग्राममित्र आणि युसुफ मेहेरअली सेंटर यांच्यावतीने पनवेल तालुक्यातील  कुष्ठरोग निवारण समिती शांतिवन येथे दि. दोन दिवसीय संविधान प्रचारक शिबीर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिराच्या उदघाटन प्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता दाभोळकर, सामाजिक कार्यकर्ते अल्लाउद्दीन शेख, सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, साधना वैराळे, गाडगीळ, नागेश जाधव, लोकशाहीर संभाजी भगत, निलेश खानविलकर, प्रवीण जठार आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शिबिरार्थींना मार्गदर्शन करताना मुक्ता दाभोळकरांनी सांगितले की, संविधानातील मूल्ये ही भारतीयांच्या जगण्याचा भाग झाला पाहिजे आणि यासाठी संविधान प्रचारक शिबिरात आलेल्या प्रत्येक शिबिरार्थीने संविधानाचे "संवादक" होऊन खेड्यापाड्यातील अंतिम माणसापर्यंत ही मूल्ये पोहोचविल्याशिवाय देशातील असंविधानिक प्रक्रियांना आळा बसणार नाही. यासाठी मी माझ्यापासून प्रयत्न करेन. तर देशातील सत्ताधारी, धार्मिक आणि भांडवलशाही व्यवस्थेला पूरक वातावरण निर्मितीचा प्रयत्न करणाऱ्यांना रोखण्यासाठी संविधान प्रचारक च्या माध्यमातून संविधान मानणार्‍या भारतीय नागरिकांची लोकचळवळ व्हावी यासाठी सुशिक्षत तरुण स्वतःहुन संघटित होत आहेत ही निश्चितच सकारात्मक बाब असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी मांडले. संविधान प्रचारक घडविण्याची जबाबदारी ही सर्व भारतीय नागरिकांची आहे असे मानून विविध संस्था-संघटना एकत्रित येऊन संविधान प्रचारक घडवीत आहेत. यासाठी वेगवेगळ्या पातळीवर कार्यशाळा, शिबिरं आणि छावणी घेतल्या जातात. या कार्यक्रमांद्वारे संविधान प्रचारक घडविण्यासाठी महाराष्ट्राच्या प्रत्येक तालूका/जिल्ह्यामध्ये प्रशिक्षित प्रशिक्षक तयार करण्याचे काम अधिक गतिमानातेने करण्याचे आश्वासन अल्लाउद्दीन शेख यांनी दिले. या शिबिरात तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती.

Popular posts from this blog