- विशेष वृत्त - 
समीर बामुगडे, रोहा (जि. रायगड) 




१ मार्च ला शांतीवनात मित्र मेळावा 

जेष्ठ साहित्यीक सदानंद मोरेंसह राज्यमंत्री आदिती तटकरे राहणार उपस्थित

पनवेल तालुक्यातील शांतीवनातील कुष्ठरुग्णांचा ४१ वा मित्र मेळावा १ मार्च २०२० रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, रायगडच्या पालकमंत्री तथा राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या मित्र मेळाव्यात समाजातील सर्व समाजप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन शांतीवनचे कार्याध्यक्ष अॅड. प्रमोद ठाकूर यांनी केले आहे.
भारतीय स्वातंत्र्य प्राप्तीनंतर राष्ट्रपिता महात्मा गांधींनी त्यांच्या अनुयायांना गावात जाऊन सेवा करण्याचे आवाहन केले होते. याच आवाहनाला प्रतिसाद देत पनवेल येथील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक अप्पासाहेब वेदक यांनी सन १९५३ मध्ये कुष्ठ रुग्णांची सेवा करण्याचे ठरविले आणि पनवेल तालुक्यातील नेरे शांतीवन येथे कुष्ठरोग निवारण समिती या नावाने धर्मादाय संस्था नोंदणी करून ज्या काळात कुष्ठरोग म्हणजे महारोग असे मानून कुष्ठरोग झालेल्या रुग्णांना घराबाहेरच नव्हे; तर गावांमध्येही थारा मिळत नव्हता त्या काळात अशा महारोग्यांना शांतीवनात आणून त्यांच्यावर उपचार करून त्यांचे पुनर्वसन करण्याचे काम सुरू केले. बघता बघता ह्या कामाला ६७ वर्ष पूर्ण झाली. ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते कै. अण्णा साहेब, कै.आक्कासाहेब वेदक, कै.पुखजीशेठ कसाट, कै. मगनभाई राणा, कै.स. म. प्रभू गुरुजी, कै. पंड्या गुरुजी इत्यादी सेवाभावी कार्यकर्त्यांनी शांतीवन उभारणीत भरीव योगदान दिले. यासोबतच सर्वोदयी नेते अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे, गोविंदराव शिंदे, माजी आमदार प्रकाशभाई मोहाडीकर, हरिभाऊ दामले, कै.भागवत व इतर सहकारी यांनी पुढील कार्याच्या व्यापक पाया घातला आहे. संयुक्त महाराष्ट्र समितीचे अर्धव्यू साथी एस. एम. जोशी उर्फ अण्णा, माजी खासदार कै. भाऊसाहेब धामणकर, कै. रामभाऊ अण्णा मोहाडीकर, मुंबई उच्च न्यायालयाचे माजी प्रभारी मुख्य न्यायाधीश तथा थोर गांधीवादी विचारवंत चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी अध्यक्षपदी राहून कार्याचा विस्तार केला असून सध्या ह्या संस्थेच्या अध्यक्षा ज्येष्ठ गांधीवादी कार्यकारत्या श्रीमती रक्षाबेन मेहता काम पाहत आहेत. संस्थेचा मूळ उद्देश कुष्ठरोग निवारण व कुष्ठरोग्यांची पुनर्वसन हा आहे कुष्ठरोग बाबत समाजात असलेली घृणा व भीती कमी करण्यासाठी व संस्थेच्या कार्याचा गती देण्यासाठी विद्यार्थी संस्कार शिबीर ग्रामीण विकास वृद्धाश्रम निसर्गउपचार केंद्र आदिवासी मुलांसाठी निवासी आश्रम शाळा शेती विभाग विकलांग मुलांसाठी आधार घर इत्यादी उपक्रम या संस्थेने हाती घेतले आहेत. सन 1980 पासून कुष्ठरुग्ण बंधू-भगिनींशी मार्गदर्शक मित्र, हितचिंतक व देणगीदार यांचा एकत्रित संवाद व्हावा या हेतूने मित्र मेळाव्याचे आयोजन केले जाते. दरवर्षीप्रमाणे १ मार्च रोजी या मित्र मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मित्र मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध साहित्यीक तथा कीर्तनकार डॉ. सदानंद मोरे व राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालक मंत्री आदिती तटकरे उपस्थित राहणार आहेत. दुपारच्या सत्रात संस्थेच्या अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे आदिवासी आश्रम शाळेला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आदिवासी आश्रमशाळेतील मुले विशेष सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत. तरी या मित्र मेळाव्याला समाजातील सर्व घटकांनी सहभागी होऊन कुष्ठरुग्णांप्रती आपला स्नेहभाव दर्शविण्याचे आवाहन शांतीवन संस्थेचे कार्याध्यक्ष अॅड. प्रमोद ठाकूर यांनी केले आहे.

Popular posts from this blog