...तर पॅन कार्ड रद्द होणार, आयकर विभागाचा 17 कोटी नागरिकांना निर्वाणीचा इशारा
मुंबई : देशातील 17 कोटी नागरिकांनी अद्यापही आपलं पॅन कार्ड आधार कार्डसोबत लिंक केलेलं नाही. मात्र, येत्या 31 मार्च 2020 पर्यंत पॅन कार्डला आधार कार्डसोबत लिंक केलं नाही तर 17 कोटी नागरिकांचे पॅन कार्ड रद्द होतील, असा निर्वाणीचा इशारा केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (सीबीडीटी) दिला आहे.
पॅन कार्डला आधार कार्डसोबत लिंक करण्यासाठी केंद्र सरकारने याअगोदर अनेकवेळा मुदतवाढ दिली आहे. मात्र, अजूनही देशातील 17 कोटी नागरिकांनी आपलं पॅन कार्ड आधार कार्डसोबत लिंक केलेलं नाही. त्यामुळे येत्या 31 मार्च 2020 पर्यंत या नागरिकांनी पॅन कार्ड आधार कार्डसोबत लिंक केलं नाही तर त्यांचे पॅन कार्ड रद्द होणार आहे.
सीबीडीटीने दिलेल्या माहितीनुसार, 27 जानेवारी 2020 पर्यंत 30.75 कोटी पॅन कार्ड आधार कार्डसोबत लिंक करण्यात आले आहेत. मात्र, तरीही अजून 17.58 कोटी पॅन कार्ड आधार कार्डसोबत लिंक करण्यात आलेले नाहीत.
कलम 139 अ (2) च्या अंतर्गत 1 जुलै 2017 पर्यंत ज्या लोकांकडे पॅन कार्ड आणि आधार कार्ड आहेत त्यांनी आयकर विभागाला आधार क्रमांकाचा नंबर देणं अनिवार्य आहे.
कसं कराल पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक?
– सर्वात अगोदर आयकर विभागाची अधिकृत वेबसाईट incometaxindiaefiling.gov.in वर जावं लागेल.
– वेबसाईटवर आल्यानंतर डाव्या बाजूला आधार कार्डशी लिंक करण्याचा पर्याय दिसेल.
– त्यानंतर नवीन पेज ओपन होईल. या नव्या पेजवर लाल रंगात Click here असं लिहिलं असेल.
– तुम्ही याअगोदर पॅन कार्ड आधार कार्डसोबत लिंक केलं असेल तर या पेजवर क्लिक करुन तुम्ही त्याची पडताळणी करु शकतात.
– तुम्ही लिंक केलं नसेल तर Click here च्या खाली बॉक्समध्ये पॅन नंबर, आधार नंबर आणि नाव विचारलं असेल. ते सर्व पर्याय भरायचे.
– त्यानंतर Link Aadhar या पर्यायावर क्लिक करायचे. या क्लिकसोबतच पॅन कार्डला आधार कार्डसोबत लिंक करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.