कुशिनारा बुद्धविहार वडवली येथे वर्षावास धम्म प्रवचन कार्यक्रम मंगलमय वातावरणात संपन्न
तथागतांच्या विचारांचा जागर
माणगाव-रायगड, दि. ६ (उत्तम तांबे) :- बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा माणगाव यांच्या मार्गदर्शनाखाली, बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक १० (चारगाव ग्रुप वडवली विभाग) यांच्या वतीने ४ ऑक्टोबर २०२६ रोजी कुशिनारा बुद्धविहार, वडवली येथे वर्षावास धम्म प्रवचन मालिका कार्यक्रम अत्यंत मंगलमय आणि उत्साही वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माणगाव तालुका शाखेचे खजिनदार सुरेंद्र जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाचा प्रारंभ ज्येष्ठ समाजसेवक सुधाकर हाटे व राजेंद्र मोरे यांच्या शुभहस्ते धम्मध्वजारोहण करून करण्यात आला.
त्यानंतर बौद्धाचार्य लक्ष्मण मोरे व अनिश येलवे यांनी उपस्थितांकडून सामुदायिक मंगल वाणीतून त्रिसरण, पंचशील आणि बुद्धपूजेचे पठण करून घेतले. पूजेनंतर उपस्थित मान्यवरांचे स्थानिक शाखेच्या वतीने यथोचित स्वागत व सन्मान करण्यात आला. या मंगल प्रसंगी प्रसिद्ध प्रबोधनकार कुंदा खरात यांनी 'बुद्धधम्म : काल आणि आज' या महत्त्वपूर्ण विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. आपल्या ओघवत्या आणि अभ्यासपूर्ण व्याख्यानातून त्यांनी धम्माची मूळ तत्त्वे, आजच्या सामाजिक संदर्भातील त्याची गरज आणि मानवी जीवनातील नैतिक मूल्यांचे महत्त्व यावर सखोल व परिवर्तनशील विचार मांडले.
सदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन शाखेचे सचिव सिद्धार्थ मोरे व कोषाध्यक्ष नरेश साळवे यांनी केले, तर कार्यक्रमासाठी भोजनाची व्यवस्था संदीप मोरे यांच्या दातृत्वातून करण्यात आली होती. या भव्य कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनात वडवली स्थानिक ग्रामस्थ, मुंबई संघमित्रा महिला मंडळ, भीम इलेव्हन क्रिकेट क्लब वडवली, तारणे बौद्ध विकास मंडळ (स्थानिक व मुंबई), प्राजक्ता महिला मंडळ, शिल्पकार क्रिकेट संघ तारणे, आत्माराम बौद्ध विकास मंडळ व महिला मंडळ शिरवली तसेच काचले बौद्धजन सेवा संघ व महिला मंडळ या सर्व स्थानिक सामाजिक संघटनांनी सक्रिय सहभाग नोंदवत मोलाची व्यवस्था सांभाळली.
या कार्यक्रमास बौद्धजन पंचायत समिती माणगाव तालुका अध्यक्ष रवींद्र मोरे, सचिव आर. डी. साळवी, कायदेशीर सल्लागार ॲड. नरेश जाधव, प्रसिद्धी प्रमुख उत्तम तांबे, विश्वास गायकवाड, शाखा क्रमांक एकचे सहसचिव प्रकाश मोरे, शाखा क्रमांक पाचचे ऑडिटर संतोष मोरे आणि शाखा क्रमांक सहाचे सचिव अरविंद मोरे यांच्यासह पंचक्रोशीतील बहुसंख्य उपासक व उपासिका उपस्थित होत्या. कार्यक्रमाचा समारोप शाखेचे उपाध्यक्ष यशवंत शिर्के व सहखजिनदार संजय जाधव यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. उपस्थितांनी या कार्यक्रमाचे नियोजन आणि प्रबोधनात्मक विचारांचे विशेष कौतुक केले.




Comments
Post a Comment