ब्रेकिंग न्यूज
🚨 बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १२ बांगलादेशी घुसखोरांना हुसकावले! पोलीय अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव 🚨

मटका माफियांना कोलाड पोलिसांचे अभय?

संसारांची राखरांगोळी होत असतानाही कारवाई शून्य!

स.पो.नि. भारत फार्णे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

 'खाकी'ला मटका जुगाराचा 'डाग?' 

कोलाड-रायगड, दि. १ (प्रतिनिधी) :- ​रोहा तालुक्यातील कोलाड आणि लगतच्या भागात बेकायदेशीर मटका जुगाराचे जाळे दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत चालले असून मटका चालकांनी संपूर्ण परिसरात उच्छाद मांडला आहे. उघड माथ्याने सुरू असलेल्या या काळ्या धंद्याकडे स्थानिक पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा थेट आरोप नागरिकांकडून केला जात आहे. मटका अड्ड्यांवरून कोलाड पोलीस ठाण्यापर्यंत नियमित हफ्ते पोहोचवले जात असल्यानेच खाकी वर्दीने या गंभीर समस्येकडे डोळेझाक केली असल्याची जोरदार चर्चा संपूर्ण तालुक्यात रंगू लागली आहे.
​अवैध मटक्याच्या या वाढत्या प्रसारामुळे स्थानिक पोलिसांचे खिसे चांगलेच भरत असून, त्यांना सध्या ‘सुगीचे दिवस’ आल्याचे नागरिक उघडपणे बोलून दाखवत आहेत. दुसरीकडे, सर्वसामान्य घरांमधील कष्टकरी आणि तरुण पिढी या जुगाराच्या नादी लागून आर्थिक संकटात अडकली आहे. रोजंदारीवर पोट भरणाऱ्या अनेकांचे संसार या मटक्यामुळे पार उद्ध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत, ज्यामुळे परिसरातील कुटुंबव्यवस्था धोक्यात आली आहे.
​कोलाड पोलीस ठाण्याची सूत्रे नुकतीच सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत फार्णे यांच्या हाती सोपवण्यात आली आहेत. नवीन अधिकारी आल्यानंतर गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांना चाप बसेल, अशी भाबडी आशा स्थानिक जनतेला होती. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती पूर्णपणे उलट असल्याचे पाहायला मिळत असून, भारत फार्णे यांचे संपूर्ण कायदा आणि सुव्यवस्थेवरील नियंत्रण सुटल्याचेच यातून स्पष्ट होत आहे. गुन्हेगारांवर दरारा निर्माण करण्यात पोलीस प्रशासन सपशेल अपयशी ठरल्याची भावना नागरिकांमध्ये बळावली आहे.
​या गंभीर गैरप्रकाराविरोधात कोलाड परिसरातील सजग नागरिक आणि विशेषतः महिला वर्ग आक्रमक भूमिकेत आला असून, या मटका माफियांवर तात्काळ कठोर आणि धडक कारवाई करावी, अशी एकमुखी मागणी लावून धरली जात आहे. हप्तेखोरीला बळी पडून दुर्लक्ष करणाऱ्या यंत्रणेकडून या अड्ड्यांवर कायमचा बुलडोझर कधी फिरवला जाणार आणि सामान्य जनतेची या मटका जुगाराच्या विळख्यातून कधी सुटका होणार, असा जाब आता सर्वसामान्य जनता विचारत आहे.

Comments

Popular posts from this blog