ब्रेकिंग न्यूज
🚨 बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १२ बांगलादेशी घुसखोरांना हुसकावले! पोलीय अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव 🚨

सांस्कृतिक अतिक्रमण रोखण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या २२ प्रतिज्ञांचे तंतोतंत पालन करा!

भारतीय बौद्ध महासभा कार्याध्यक्ष डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांचे आवाहन

 समतेचा विचार घराघरात पोहोचवा 

​बेणसे-रायगड, दि. २८ (चंद्रकांत अडसुळे) :- सध्याच्या आधुनिक इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल युगात मोबाईल तसेच इंटरनेटच्या अतिवापरामुळे मानवी मूल्यांचा आणि मूळ संस्कृतीचा वेगाने ऱ्हास होत चालला आहे. या काळात होणारे सांस्कृतिक अतिक्रमण रोखायचे असेल, तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञांचे प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात तंतोतंत पालन करणे काळाची गरज आहे, असे ठाम प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी केले. वंचित बहुजन आघाडी पेण तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वर्षावास धम्म प्रवचन मालिकेच्या १४ व्या पुष्पानिमित्त आयोजित भव्य मेळाव्यात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. समाजात 'नमो बुद्धाय' आणि 'जय भीम'चा जयघोष निनादत राहिला पाहिजे, तसेच बुद्धिजमचा प्रचार आणि प्रसार अधिकाधिक व्यापक पातळीवर झाला पाहिजे. विषमतेवर आधारलेल्या प्रतिगामी विचारांवर वैज्ञानिक दृष्टिकोन व सकारात्मक विचारांचा प्रभाव पाडून समतावादी समाजव्यवस्था प्रस्थापित करावी लागेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हा देश अंधश्रद्धामुक्त व विज्ञानवादी व्हावा यासाठी आयुष्यभर अहोरात्र प्रयत्न केले असून, तोच विचार पुढे नेण्यासाठी समता सैनिक दलाचे भव्य अधिवेशन लवकरच मुंबईमध्ये आयोजित करण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणाही त्यांनी यावेळी केली.

​आपल्या विस्तृत मार्गदर्शनात डॉ. भीमराव आंबेडकर यांनी जागतिक स्तरावर भारताच्या बौद्ध वारशाचे महत्त्व अधोरेखित केले. भारत हा जगाला बुद्धिजमची महान देणगी देणारा देश म्हणून जगभर आदराने ओळखला जातो. बिहारमधील पवित्र बोधगया येथे देश-विदेशातील लाखो पर्यटक व बौद्ध अनुयायी दरवर्षी मोठ्या श्रद्धेने येत असतात, ज्यामुळे भारताच्या परकीय चलनामध्ये लक्षणीय वाढ होते. तथापि, जगभरातील बौद्ध धर्मीयांचे सर्वोच्च श्रद्धास्थान असलेल्या बोधगया महाबोधी महाविहारावर गैर-बौद्ध घटकांनी अतिक्रमण करून तेथील संपूर्ण व्यवस्थापन आणि आर्थिक व्यवहार आपल्या ताब्यात घेतले आहेत. हे ऐतिहासिक व धार्मिकदृष्ट्या अत्यंत चुकीचे असून, या अन्यायाविरोधात सुरू असलेल्या कायदेशीर व न्यायालयीन लढाईत सत्याचाच विजय होईल आणि महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्ध समाजाच्याच हाती येईल, असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी आनंद सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सुप्रिया धामणकर यांनी तब्बल ४ मीटर कापडावर स्वतःच्या हाताने रांगोळीच्या माध्यमातून साकारलेले अप्रतिम व कलात्मक वॉलपीस प्रमुख अतिथी डॉ. भीमराव आंबेडकर यांना सन्मानपूर्वक भेट देऊन त्यांचा विशेष गौरव केला.

​कार्यक्रमाचे आयोजक तथा वंचित बहुजन आघाडीचे पेण तालुका अध्यक्ष सुनील प्रल्हाद धामणकर यांनी आपल्या प्रास्ताविक व मार्गदर्शनपर भाषणात उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, वर्षावास धम्म प्रवचन मालिकेच्या माध्यमातून भगवान गौतम बुद्धांचे शांती व करुणेचे धम्मविचार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक क्रांतीचा विचार समाजातील तळागाळातील प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचविणे हे आपले प्रमुख उद्दिष्ट आहे. भगवान बुद्धांचा धम्म कोणत्याही व्यक्तीचा अथवा घटकाचा द्वेष करायला शिकवत नाही, तर तो एका माणसाला दुसऱ्या माणसाशी प्रेमाने व करुणेने जोडण्याचे काम करतो. तथागत बुद्धांनी मानवाचे मन बदलण्याचा मार्ग दाखविला, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अन्यायग्रस्त समाज बदलून त्याला स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग दाखविला आहे; याच वैचारिक मार्गावर चालून आपल्याला समग्र समाजाचा आणि देशाचा सर्वांगीण विकास साधायचा आहे. आनंद सामाजिक विकास संस्थेच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या विवाह संस्थेचे कार्य अत्यंत स्तुत्य असल्याचे सांगत, महिला सक्षमीकरणासाठी समाजातील भगिनींनी निर्भयपणे पुढे येऊन महिला बचत गटांच्या माध्यमातून उद्योग-व्यवसाय उभारून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

​या भव्य सोहळ्याच्या व्यासपीठावर भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र प्रदेश संस्कार उपाध्यक्ष विजय कांबळे, केंद्रीय सदस्या सुनंदाताई वाघमारे, पेणचे पोलिस उपनिरीक्षक सुभाष सोनावळे, भारतीय बौद्ध महासभा पेण तालुका अध्यक्ष चंद्रकांत सोनवणे, वंचित बहुजन आघाडी पेण तालुका अध्यक्ष सुनील प्रल्हाद धामणकर, रायगड जिल्हा उत्तर महिला अध्यक्षा उषा कांबळे यांच्यासह भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडीचे अनेक जिल्हा व तालुका पातळीवरील प्रमुख पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान पेण तालुक्यात सामाजिक, शैक्षणिक आणि जनहिताच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विविध मान्यवर कार्यकर्त्यांना 'रायगड समाजरत्न पुरस्कार' देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे दहावी, बारावी व उच्च शिक्षणामध्ये विशेष यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही शाल, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन विशेष गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन आणि आभारप्रदर्शनाने या प्रेरणादायी धम्म प्रवचन सोहळ्याची अत्यंत उत्साही वातावरणात सांगता झाली.

Comments