ब्रेकिंग न्यूज
🚨 सार्वजनिक गणेशोत्सवासाठी परवानगी प्रक्रिया आता गतिमान! सिटीझन पोर्टल'द्वारे ऑनलाइन अर्ज करावेत : रायगड पोलिसांचे आवाहन 🚨

​भिसे खिंडीत झाड व मातीचा ढिगारा कोसळल्याने वाहतूक ठप्प!

पोलिसांकडून रस्ता मोकळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू
 अनेक झाडे धोकादायक 

नागोठणे-रायगड, दि. ५ (महेंद्र माने) :- ​नागोठणे शहर आणि परिसरात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागोठणे-रोहा मार्गावर वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. या मार्गावरील भिसे खिंडीत, आमडोशी फाट्याजवळ रविवार, ५ जुलै रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास एक मोठे झाड आणि मातीचा प्रचंड ढिगारा अचानक रस्त्यावर कोसळला. यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.

​या घटनेची माहिती मिळताच नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे यांनी कर्मचाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जेसीबी (JCB) यंत्राच्या सहाय्याने रस्त्यावरील झाड बाजूला करण्याचे आणि साचलेली माती साफ करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले. तात्काळ सुरू केलेल्या या मदतकार्यामुळे लवकरच हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे मोकळा करण्यात येईल, असा विश्वास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे यांनी दिला आहे.

​दरम्यान, या संपूर्ण भिसे खिंडीत अजूनही अनेक झाडे अतिशय धोकादायक स्थितीत उभी आहेत. मुसळधार पाऊस सुरूच असल्याने ही झाडे कधीही रस्त्यावर कोसळून मोठा अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने कोणतीही मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच ही धोकादायक झाडे तातडीने बाजूला करावीत, अशी आग्रही मागणी आता वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे.

Comments

Popular posts from this blog