दुःख आणि वेदना पचवून जिद्दीने उभी राहणारी माणसेच मोठी होतात - आदिवासी कन्या ॲड. सपना वाघमारे
छत्रपती शिक्षण मंडळाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा थाटात गुणगौरव
कल्याण वृत्त, दि. १८ (भिवा पवार) :- "जी माणसं दुःख आणि वेदना पितात, तीच माणसं आयुष्यात मोठी होतात. माणसाने दुःख आणि वेदना पचवायला शिकले पाहिजे, कारण याच संघर्षातून माणसाला खरे बळ मिळते. तुमच्या मनात जर खरी जिद्द असेल, तर तुम्ही कोणत्याही खडतर परिस्थितीवर मात करू शकता. शिक्षण घेत असताना वाटेत कितीही दुःख किंवा वेदना आली, तरी परिस्थितीसमोर कधीही डगमगू नका. आपला निर्धार कायम ठेवून दुःखाला धैर्याने सामोरे जाणे, यातच यशाची खरी गुरुकिल्ली दडलेली आहे," असे प्रेरणादायी प्रतिपादन लंडन विद्यापीठात एलएलएम (LLM) उच्च शिक्षणासाठी निवड झालेल्या कोलाड चिंचवली येथील ॲडव्होकेट कुमारी सपना वाघमारे यांनी केले. छत्रपती शिक्षण मंडळ, कल्याण आयोजित माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा २०२६ च्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभात त्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होत्या. कल्याण येथील अभिनव विद्यामंदिर, पारनाका येथे हा दिमाखदार सोहळा संपन्न झाला.
याप्रसंगी पुढे बोलताना ॲड. सपना वाघमारे यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. त्या म्हणाल्या की, छत्रपती शिक्षण मंडळाचे कार्य हे समाजासाठी एका दीपस्तंभासारखे मार्गदर्शक आणि अत्यंत कौतुकास्पद आहे. मागेल त्याला शिक्षण देऊन, समाजातील शोषित, वंचित आणि आदिवासी घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे अत्यंत पवित्र कार्य छत्रपती शिक्षण मंडळ आणि त्याचे सर्व पदाधिकारी प्रामाणिकपणे करत आहेत, याचा मला विशेष अभिमान वाटतो. या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आणि 'वंदे मातरम' या राष्ट्रभक्तीपर गीताने अत्यंत उत्साही वातावरणात झाली. या विशेष कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती शिक्षण मंडळ कल्याणचे संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. नारायण फडके हे होते. तर व्यासपीठावर संस्थेचे सरचिटणीस डॉ. निलेश रेवगडे, प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले विज्ञान भारतीचे सुभाषजी पाटील, विद्याभारतीचे विवेक पुराणिक, संस्कृत भारतीच्या श्यामलाताई भट आणि संस्थेच्या चिटणीस सारिका कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्यात छत्रपती शिक्षण मंडळ, कल्याण संचलित विविध शाळांमधील माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. विद्यालयात कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेत प्रथम क्रमांक पटकवणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी यथोचित गुणगौरव झाला. तसेच मार्च महिन्यातील शालांत परीक्षेत संपूर्ण संस्थेत प्रथम येण्याचा बहुमान मिळवलेल्या, आपापल्या विद्यालयात अव्वल स्थान पटकावलेल्या आणि विशिष्ट विषयांमध्ये सर्वोच्च गुण मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांसोबतच ज्या शाळांचा निकाल १००% लागला आहे, अशा विद्यालयांच्या मुख्याध्यापकांचाही स्मृतिचिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात आला. यामध्ये गंगा गोरजेश्वर विद्यामंदिर फळेगावचे श्री. राठोड सर, सह्याद्री विद्यालय नारिवलीचे श्री. निंबाळकर सर, श्री जयेश्वर विद्यामंदिर डेंगाची मेटचे श्री. मराड सर, माध्यमिक विद्यालय नांदकर सांगेचे श्री. सोनावणे सर, माध्यमिक विद्यामंदिर रातवडचे श्री. कदम सर, जय जवान जय किसान शाळा वाघेरीचे श्री. भेदाटे सर, माध्यमिक विद्यालय सानपाडा (मराठी माध्यम) चे श्री. व्हावळ सर आणि माध्यमिक विद्यालय सानपाडा (इंग्रजी माध्यम) च्या सौ. रावत मॅडम या सर्व यशस्वी मुख्याध्यापकांचा व्यासपीठावर मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण या संस्थेचे मुख्याध्यापक श्री. रमाकांत पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करत उपस्थित विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन केले. या प्रसंगी छत्रपती शिक्षण मंडळाचे कार्यकारी सदस्य मिलिंद कुलकर्णी, माजी सरचिटणीस ठाकूर देसाई, किशोर आल्हाट, अभिनव विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. संपत गीते, एनईपी (NEP) समन्वयक उर्मिला जाधव मॅडम यांच्यासह संस्थेच्या एकूण ५६ शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते आणि शेवटी सामूहिक 'महाराष्ट्र गीताने' या शानदार सोहळ्याची सांगता करण्यात आली.


Comments
Post a Comment