पावसासाठी मुस्लिम बांधवांचे सामुदायिक नमाज! प्रार्थनेनंतर रोह्यात मुसळधार सरी
रोहा-रायगड, दि. २१ (संदीप सरफळे) :- पावसाने दडी मारल्याने नागरिकांसह शेतकरी, पशुपक्षी आणि सृष्टीतील प्रत्येक सजीव चिंतेत असताना रोहा-अष्टमी येथील मुस्लिम समाज बांधवांनी पावसासाठी सामुदायिक नमाज अदा करून अल्लाहकडे दुवा (प्रार्थना) केली. विशेष म्हणजे नमाज व प्रार्थना संपल्यानंतर काही वेळातच रोह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने उपस्थितांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
पाऊस पडावा, दुष्काळाचे सावट दूर व्हावे आणि सर्व सजीवांना दिलासा मिळावा या उद्देशाने मुस्लिम समाजातील अनेक बांधवांनी सलग तीन दिवस उपवास पाळले होते. त्यानंतर रविवारी सकाळी ८ वाजता गौळवाडी रोडवरील क्रिकेट मैदानावर सामुदायिक नमाज व दुवा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
जामे मस्जिद रोहाचे मौलवी मौलाना सादिक मुकादम यांच्या नेतृत्वाखाली हा धार्मिक उपक्रम पार पडला. नमाजपूर्वी मार्गदर्शन करताना त्यांनी मानवाने आपल्या चुकीच्या कृत्यांबद्दल अल्लाहकडे क्षमा मागून प्रामाणिकपणे प्रार्थना करावी, संकटांच्या काळात नमाज व दुवाचे महत्त्व अधिक अधोरेखित होते, असे सांगितले. पैगंबरांनी शिकविलेल्या मार्गानुसार पश्चात्ताप, नमाज आणि दुवा यांद्वारे अल्लाहची रहमत प्राप्त होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यानंतर सामुदायिक नमाज अदा करण्यात आली. खूतबा वाचनानंतर सर्वांनी एकत्रितपणे पावसासाठी मनोभावे दुवा केली. प्रार्थना संपताच आभाळ दाटून आले आणि काही वेळातच रोह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. कोरड्या धरतीला जलधारा लाभल्याने परिसरात मातीचा दरवळ दरवळू लागला, झाडाझुडपांना नवसंजीवनी मिळाली आणि गार वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसाने वातावरण प्रसन्न व आल्हाददायक झाले. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला.
या सामुदायिक नमाज व दुवा कार्यक्रमाला रोहा-अष्टमी परिसरातील शेकडो मुस्लिम बांधव मोठ्या श्रद्धेने उपस्थित होते.

Comments
Post a Comment