"शिक्षा बचाओ, भविष्य बचाओ" घोषणेखाली उत्तर मुंबईत देशव्यापी विद्यार्थी आंदोलन
मुंबई, दि. ४ (प्रतिनिधी) :- शिक्षणाचे वाढते व्यापारीकरण, विद्यार्थ्यांवर लादले जाणारे अनावश्यक आर्थिक ओझे आणि 'NEET' सह इतर प्रवेश प्रक्रियांमध्ये विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांच्या विरोधात आज उत्तर मुंबई जिल्ह्यात जोरदार आवाज उठवण्यात आला. येथील काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली "शिक्षा बचाओ, भविष्य बचाओ" या घोषणेखाली देशव्यापी विद्यार्थी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.
या आंदोलनात विद्यार्थी, पालक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. "शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत अधिकार असून ते सर्वांसाठी परवडणारे व गुणवत्तापूर्ण असावे," अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. तसेच, शासनाने शिक्षण क्षेत्रातील व्यापारीकरणावर तात्काळ नियंत्रण आणावे, विद्यार्थ्यांवरील आर्थिक भार कमी करावा आणि प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता व न्याय सुनिश्चित करावा, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली.
या आंदोलनात उत्तर मुंबई जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजपत यादव, उत्तर मुंबई जिल्हा काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हा महासचिव पूनम शिंदे, आणि ब्लॉक १४ च्या अध्यक्षा नंदा तलवटकर प्रामुख्याने उपस्थित होत्या. त्यांच्यासह इतर अनेक काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी आणि पालकांनी आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवत, विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी एकजुटीने लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

Comments
Post a Comment