ब्रेकिंग न्यूज
🚨 महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना आता मिळणार दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी 🚨

​शिहू–बेणसे विभागातील वीजसमस्येवर तोडगा!

शिवसेना संपर्क प्रमुख प्रसाद भोईर यांच्या नेतृत्वात आढावा बैठक संपन्न

पेण-रायगड, दि. ३० (प्रतिनिधी) :- शिहू–बेणसे विभागातील वीजपुरवठा अधिक सक्षम, स्थिर आणि अखंडित राहावा या उद्देशाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रायगड जिल्हासंपर्क प्रमुख प्रसाद भोईर यांच्या विशेष पुढाकाराने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात एका महत्त्वपूर्ण आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला महावितरणचे अधीक्षक अभियंता धनराज बिक्कड, पेणचे उपअभियंता श्री. थत्ते, तसेच सहाय्यक अभियंता श्री. तांदळे हे प्रामुख्याने उपस्थित होते. या बैठकीत शिहू-बेणसे परिसरातील वीजसमस्येशी संबंधित पूर्वी झालेल्या निर्णयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला आणि प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी अनेक महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेण्यात आले.

​बैठकीदरम्यान परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी विविध तांत्रिक उपाययोजनांवर सखोल चर्चा झाली. याअंतर्गत पुढील दोन ते तीन दिवसांत नागोठणे फिडर आणि पांडापूर फिडरच्या सहाय्यक अभियंत्यांकडून संयुक्त पाहणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे शिहू–बेणसे विभागाला नवीन रिलायन्स फिडरशी जोडण्यासाठी आवश्यक असलेला सुमारे २ किलोमीटरचा नवीन कंडक्टर तातडीने टाकण्याचे स्पष्ट निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त कोलेटी खाडी परिसरातील उर्वरित १ किलोमीटर अंतरावरील वीजेचे पोल रस्त्याच्या बाजूने स्थलांतरित करून प्रलंबित असलेले काम पूर्ण करण्यावरही एकमत झाले. तसेच पोयनाड फिडरवरून अतिरिक्त वीजवाहिनी घेण्याचे काम वन विभागाच्या परवानगीअभावी रखडले होते, ते कामही बैठकीतील सकारात्मक चर्चेनंतर मार्गी लागले असून हे काम तातडीने सुरू करण्याचे आदेश महावितरण अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

​या सर्व प्रस्तावित कामांमुळे चोळे, शिहू, झोतिरपाडा, बेणसे, बेणसेवाडी, कुहिरे यांसह संपूर्ण परिसरातील वारंवार खंडित होणाऱ्या विजेची समस्या, कमी दाबाने होणारा वीजपुरवठा आणि इतर तांत्रिक अडचणी मोठ्या प्रमाणात दूर होण्यास मदत होणार आहे. या बैठकीस शिवसेना उपतालुका प्रमुख हिराजी चोगले आणि विभाग प्रमुख गजानन मोकल यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. बैठकीदरम्यान प्रसाद भोईर यांनी महावितरणच्या कारभारावर आणि वारंवार मिळणाऱ्या आश्वासनांवर तीव्र नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना ठणकावले की, यापूर्वी अनेकदा केवळ आश्वासने दिली गेली आहेत, मात्र यावेळी नागरिक केवळ आश्वासनांवर शांत बसणार नाहीत. संयुक्त पाहणीच्या टप्प्यापासून ते कामाच्या अंतिम टप्प्यापर्यंत सर्व प्रक्रियेत स्वतः उपस्थित राहून सातत्याने पाठपुरावा केला जाईल आणि ही कामे प्रत्यक्ष पूर्ण करूनच घेतली जातील, असा इशाराही त्यांनी याप्रसंगी दिला.

Comments

Popular posts from this blog