NEET परीक्षा गैरव्यवहार आणि पेपरफुटीविरोधात रोहा प्रेस क्लब आक्रमक!
सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शनिवारी रोह्यात होणार एक दिवसाचे अन्नत्याग आंदोलन
रोहा-रायगड, दि. १७ (प्रतिनिधी) :- देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या NEET पेपरफुटी आणि परीक्षा गैरव्यवहाराच्या प्रकरणाविरोधात आता संपूर्ण देशासह रोह्यातूनही संतापाचा ज्वालामुखी उसळला आहे. राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील (NEET) कथित पेपरफुटी आणि मोठ्या प्रमाणावर झालेल्या गैरव्यवहारामुळे संपूर्ण देशभरात प्रचंड जनक्षोभ निर्माण झाला असून, या परीक्षा पद्धतीतील गोंधळामुळे अनेक प्रामाणिक विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. परीक्षा रद्द झाल्याने आणि निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे लाखो विद्यार्थ्यांचे मानसिक संतुलन ढासळले असून, अनेक निष्पाप विद्यार्थ्यांना आपले प्राण गमवावे लागल्याने अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शिक्षण व्यवस्थेतील या गलथान कारभाराचा सर्वाधिक फटका अहोरात्र मेहनत करणाऱ्या प्रामाणिक विद्यार्थ्यांना बसत असल्याचा तीव्र संताप आता सर्व स्तरातून व्यक्त केला जात आहे.
या परीक्षा घोटाळ्याचे अत्यंत गंभीर आणि हृदयद्रावक पडसाद उमटले असून, मध्य प्रदेशहून नागपुरात वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी करण्यासाठी आलेल्या आकांक्षा चतुर्वेदी या १८ वर्षीय विद्यार्थिनीने "पुन्हा परीक्षा देण्याची हिंमत नाही" अशी उद्विग्न चिठ्ठी लिहून आपले जीवन संपविले. त्यानंतर फेरपरीक्षेच्या कठीण पातळीमुळे नैराश्यात गेलेल्या सुशील धागे या १८ वर्षीय विद्यार्थ्याने विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. महाराष्ट्रच नव्हे तर राजस्थान, गोवा आणि दिल्लीसह विविध राज्यांतही परीक्षा रद्द झाल्याच्या आणि निकालातील गोंधळाच्या धक्क्यातून अनेक विद्यार्थ्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याच्या दुर्दैवी घटना समोर आल्या असून, या हृदयद्रावक घटनांनी संपूर्ण देश हादरून गेला आहे. या पार्श्वभूमीवर NEET घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी व्हावी, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि देशातील परीक्षा पद्धतीत आमूलाग्र सुधारणा व्हावी, या प्रमुख मागण्यांसाठी प्रसिद्ध पर्यावरण व सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक मागील वीस दिवसांपासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे आमरण उपोषणाला बसले आहेत.
सोनम वांगचुक यांच्या या देशव्यापी लढ्याला आणि हक्काच्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देण्यासाठी रोहा प्रेस क्लबच्या नेतृत्वाखाली शनिवारी रोहा येथील नदी संवर्धन गार्डन येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर एक दिवसाचे लाक्षणिक अन्नत्याग आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराचा जाहीर निषेध केला जाणार असून, रोहा तालुक्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, विद्यार्थी आणि सुजाण नागरिकांनी या आंदोलनाला आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि भविष्यात पारदर्शक परीक्षा व्यवस्था निर्माण व्हावी हीच काळाची गरज असल्याचे सांगत, रोहा प्रेस क्लबचे अध्यक्ष श्याम लोखंडे यांनी या अन्नत्याग आंदोलनात तालुक्यातील नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला आवाज बुलंद करावा, असे आवाहन केले आहे.

Comments
Post a Comment