ब्रेकिंग न्यूज
🚨 महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना आता मिळणार दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी 🚨

NEET पेपरफुटी घोटाळ्याविरोधात रोह्यात तीव्र आंदोलन!

​रोहा प्रेस क्लबचे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन

 शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी 

​रोहा-रायगड, दि. १९ (प्रतिनिधी) :- देशभरात खळबळ माजवून सोडणाऱ्या NEET परीक्षा पेपरफुटी आणि परीक्षांमधील गंभीर गैरव्यवहाराच्या निषेधार्थ रोहा प्रेस क्लबच्या नेतृत्वाखाली शनिवारी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. प्रसिद्ध पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू केलेल्या आमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले होते. या आंदोलनाचे नेतृत्व रोहा प्रेस क्लबचे अध्यक्ष श्याम लोखंडे यांनी केले. त्यांच्यासोबत राजेंद्र जाधव, सुहास खरीवले, महेंद्र मोरे, संदीप सरफळे, उद्धव आव्हाड, केशव म्हस्के, ॲड. दीपक जाधव, राकेश मोरे, दीप वायडेकर, प्रदीप देशमुख, नितीन परब, ॲड. हर्षद साळवी, तुषार खरीवले, सोपान सुतार, पांडुरंग वाघमारे, उमेश दुखणे आणि दिपाली चौलकर आदी पत्रकार व पदाधिकारी या लाक्षणिक उपोषणात सक्रियपणे सहभागी झाले होते.

​या अन्नत्याग आंदोलनाला रोहा शहर आणि परिसरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, ज्येष्ठ पत्रकार, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला सक्रिय पाठिंबा दर्शवला. तसेच सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक प्रमोद म्हसकर, धाटाव औद्योगिक वसाहत कामगार संघटनेचे नेते सुर्यकांत मोरे आणि शिवसेनेच्या वतीने शहरप्रमुख राजेश काफरे यांनी आंदोलनस्थळी प्रत्यक्ष भेट देऊन पाठिंब्याचे अधिकृत पत्र सुपूर्द केले व आंदोलनात सहभाग नोंदविला. 

या आंदोलनादरम्यान उपस्थित वक्त्यांनी केंद्र सरकार आणि परीक्षा यंत्रणेवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या NEET घोटाळ्याची अत्यंत निष्पक्षपणे आणि सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी यावेळी लावून धरण्यात आली.

​त्याचप्रमाणे या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा, अशी आग्रही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या आणि या संपूर्ण घोटाळ्याला जबाबदार असणाऱ्या दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी संपूर्ण परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यात यावी, अशा विविध मागण्यांचे निवेदन यावेळी प्रशासनाला देण्यात आले. लाखो विद्यार्थ्यांच्या कष्टावर पाणी फेरून त्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या शिक्षण माफियांची गय केली जाणार नाही आणि त्यांना कधीही माफी मिळणार नाही, असा तीव्र निर्धार यावेळी सर्व आंदोलनकर्त्यांनी एकमुखाने व्यक्त केला. या आंदोलनामुळे परीक्षा व्यवस्थेतील गोंधळाविरोधात रोहा परिसरातून तीव्र संताप व्यक्त होत असल्याचे पाहायला मिळाले.

Comments

Popular posts from this blog