रोह्यात महापुराची काळरात्र!
नागरिकांचा जीव वाचविण्यासाठी प्रशासनाची रात्रभर धावपळ
भिरा धरणातून विसर्ग वाढताच शहरात मध्यरात्री पुराचे संकट! प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवकांच्या तत्परतेने मोठी जीवितहानी टळली
रोहा-रायगड, दि. ६ (प्रतिनिधी) :- भिरा जलप्रकल्प परिसरात अवघ्या एका दिवसात तब्बल २५०.२० मिमी पावसाची नोंद झाल्यानंतर भिरा पिकअप वेअरचे तीनही दरवाजे उघडून २०८.०७ घनमीटर प्रति सेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आणि मध्यरात्री रोहा शहर व अष्टमी परिसरावर महापुराचे संकट कोसळले. मुसळधार पाऊस, अंधार, वीजपुरवठा खंडित झाल्याने निर्माण झालेली भीती आणि वाढत्या पुराच्या पाण्यामुळे संपूर्ण रात्र रोह्यासाठी अक्षरशः काळरात्र ठरली.
पहाटे तीन वाजताच्या भरतीमुळे परिस्थिती आणखी गंभीर होणार असल्याचा इशारा मिळताच रोहा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजय एडके यांनी सातत्याने नागरिकांना सतर्कतेचे संदेश देत सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आवाहन केले. "पाणी ओसरेल म्हणून घरात बसून राहू नका, गरज पडल्यास बोटींद्वारे बाहेर काढले जाईल," असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला.
दरम्यान अष्टमीतील खालचा मोहल्ला, कोळीवाडा, धनगर आळी, मराठा आळी, त्रिमूर्ती नगर, शिवकृपा, धनलक्ष्मी परिसर, रोहा बाजारपेठ, कासार आळी आदी भागांत पुराचे पाणी घरांमध्ये शिरले. काही ठिकाणी तीन फूटांपर्यंत पाणी साचल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
वीज पेट्या व मीटर बॉक्स पाण्याखाली गेल्याने सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण रोहा शहराचा वीजपुरवठा बंद करण्यात आला. सायरन यंत्रणा बंद पडल्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना जागे राहण्याचे, सतर्क राहण्याचे आणि शेजाऱ्यांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले.
संकटाची तीव्रता लक्षात घेऊन रोहा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा वनश्री शेडगे स्वतः रात्रभर नियंत्रण कक्षातून परिस्थितीवर लक्ष ठेवून होत्या. पहाटे दोन ते तीन वाजेदरम्यान त्यांनी नदीकाठच्या नागरिकांशी सातत्याने संपर्क साधून धीर दिला, आवश्यक सूचना दिल्या आणि मदतकार्याचा आढावा घेतला. मुख्याधिकारी अजय एडके यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक-नगरसेविका, प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस प्रशासन, एनव्हीएसएसआर टीम, RESQ पुणे, स्थानिक स्वयंसेवक आणि तरुण यांनी परस्पर समन्वय साधत रात्रभर बचाव आणि मदतकार्य सुरू ठेवले
यावेळी माजी नगराध्यक्ष समीर शेडगे यांनीही प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून बचावकार्यात सहभाग घेतला, मदतकार्याचा समन्वय साधला आणि आपत्कालीन पथकांना सहकार्य केले. विविध विभागांतील यंत्रणांनी एकदिलाने काम केल्याने अनेक अडकलेल्या नागरिकांपर्यंत वेळेत मदत पोहोचविणे शक्य झाले.
राफ्टिंग बोटी मागवून अष्टमी परिसरात अडकलेल्या नागरिकांपर्यंत पोहोचण्यात आले. अन्सारी कुटुंबासह अनेकांना सुरक्षितपणे बाहेर काढून अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले. बोटींची वाहतूक करण्यासाठी विशेष वाहनांचीही तातडीने व्यवस्था करण्यात आली.
महापुराच्या या अभूतपूर्व संकटात नगरपालिका, महसूल प्रशासन, पोलीस यंत्रणा, एनव्हीएसएसआर, RESQ पुणे, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवक आणि स्थानिक तरुण यांनी दाखविलेली तत्परता, समन्वय आणि सेवाभाव यामुळे मोठी जीवितहानी टळली. पहाटेपर्यंत सुरू असलेल्या बचाव मोहिमेनंतर अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात यश आले. संकटाच्या काळात प्रशासन आणि समाजाने एकजुटीने दिलेला लढा हा रोह्याच्या आपत्ती व्यवस्थापनातील प्रेरणादायी अध्याय ठरल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.




Comments
Post a Comment