ब्रेकिंग न्यूज
🚨 रायगड जिल्ह्यात पावसाचे थैमान! अंबा नदीने ओलांडली धोक्याची पातळी, तर मुसळधार पावसामुळे १२ जणांचा मृत्यू... मालमत्ता व पशुधनाचे मोठे नुकसान, पंचनामे सुरू 🚨

जीव धोक्यात घालून महावितरण कर्मचाऱ्यांची अंधाराशी झुंज!

कंबरभर पाण्यात उतरून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

 पूरग्रस्त रोह्यात जीवाची बाजी 

रोहा-रायगड, दि. ८ (प्रतिनिधी) :- गेल्या आठवडाभरापासून रोहा तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले असून, त्यामुळे आलेल्या महापुराने संपूर्ण तालुक्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पूर परिस्थितीमुळे ठिकठिकाणी रस्ते खचले असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. यातच भर म्हणून तालुक्यातील अनेक मुख्य विद्युत वाहिन्यांचे खांब कोसळल्याने आणि हायव्होल्टेज तारांचे कंडक्टर तुटल्यामुळे रोहा शहरासह ग्रामीण भागातील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. अचानक ओढवलेल्या या अंधारामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत असून, पिण्याच्या पाण्यापासून ते मोबाईल नेटवर्कपर्यंतच्या सर्वच सुविधा ठप्प झाल्या आहेत. अशा अत्यंत प्रतिकूल, दुर्गम आणि धोकादायक परिस्थितीत महावितरणचे तंत्रज्ञ आणि कर्मचारी स्वतःच्या जीवाची यत्किंचितही पर्वा न करता, नागरिकांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी आणि वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी अहोरात्र मैदानावर उतरून काम करत आहेत.

​सध्या रोहा परिसरातील मेढा आणि चणेरा फिडर अंतर्गत येणाऱ्या गावांना जोडणारे व नदी ओलांडणारे मुख्य विद्युत वाहिन्यांचे कंडक्टर महापुराच्या तीव्र प्रवाहामुळे तुटले आहेत. या दोन्ही फिडरवरून मोठ्या प्रमाणावर वीजपुरवठा केला जात असल्याने सध्या संपूर्ण परिसर अंधारात बुडाला आहे. हे खंडित झालेले दळणवळण पूर्ववत करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना पाऊस आणि पुराचा कोणताही विचार न करता कंबरभर पाण्यातून वाट काढावी लागत आहे. पाण्याच्या पाण्याचा वेग अत्यंत तीव्र असून, नदीकाठच्या गाळयुक्त चिखलामुळे पाय घसरण्याचा आणि वाहून जाण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. कपाळावर विजेरी (टॉर्च) बांधून, पावसाची पर्वा न करता, जड उपकरणांसह खांबांवर चढून दुरुस्तीचे काम करताना हे कर्मचारी आपल्या जीवाची बाजी लावत आहेत.

​या संपूर्ण मोहिमेदरम्यान पाण्याचा प्रचंड वेग, सतत कोसळणारा पाऊस आणि निसरडी जमीन अशा अनेक नैसर्गिक आव्हानांचा सामना कर्मचाऱ्यांना करावा लागत आहे. प्रतिकूल हवामानामुळे कामात वारंवार अडथळे येत असतानाही, 'ग्राहक सेवा हीच ईश्वर सेवा' मानून कर्मचारी सातत्याने प्रयत्न करत आहेत. डोळ्यांसमोर मृत्यूचे संकट असतानाही कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या असीम शौर्याचे आणि अढळ कर्तव्यनिष्ठेचे कौतुक आता केवळ प्रशासकीय पातळीवरच नव्हे, तर सर्वसामान्य नागरिकांमधून आणि सामाजिक स्तरांतूनही मोठ्या प्रमाणावर केले जात आहे. अनेक ठिकाणी स्थानिक ग्रामस्थांनी या कर्मचाऱ्यांच्या धाडसाला सलाम केला असून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.

​सध्या महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण तालुक्यात युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. अतिरिक्त मनुष्यबळ आणि आधुनिक साधनसामग्री घटनास्थळी पाचारण करण्यात आली असून, विस्कळीत झालेली वीज यंत्रणा लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी संपूर्ण तांत्रिक पथक अहोरात्र झटत आहे. या गंभीर आणि आणीबाणीच्या परिस्थितीवर अधिक माहिती देताना महावितरणचे उपविभागीय अभियंता जतिन पाटील यांनी सांगितले की, मेढा व चणेरा फिडरवर नदी क्रॉस असलेले मुख्य कंडक्टर पुरामुळे तुटल्याने सुरक्षेच्या कारणास्तव दोन्ही फिडर सध्यातरी पूर्णपणे बंद ठेवावे लागले आहेत. मात्र, आमचे कर्मचारी आणि अभियंते परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असून अत्यंत वेगाने दुरुस्तीचे काम पूर्ण करत आहेत. तांत्रिक कामे अंतिम टप्प्यात आली असून पुढील अंदाजे एक ते दीड तासात या भागातील वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्णपणे पूर्ववत केला जाईल. या नैसर्गिक आपत्तीच्या काळात नागरिकांनी संयम बाळगावा, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे काम करण्यासाठी पूर्ण सहकार्य करावे, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी यावेळी सर्व वीज ग्राहकांना केले आहे.

Comments

Popular posts from this blog