ब्रेकिंग न्यूज
🚨 डिजिटल न्यूज पोर्टल्स आणि सोशल मीडिया न्यूज चॅनेल्सना केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे नोंदणी करणे बंधनकारक! 🚨

रायगड जिल्ह्यात २ ते ४ जुलैदरम्यान अतिमुसळधार पावसाची शक्यता
 नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन 

रायगड, दि. १ (विशेष प्रतिनिधी) :- भारतीय हवामान विभागाच्या दि. ३० जून २०२६ रोजीच्या हवामान बुलेटीननुसार महाराष्ट्र ते उत्तर केरळ किनारपट्टीदरम्यान कमी दाबाचा पट्टा (Off-shore Trough) सक्रिय असून मध्य-ट्रोपोस्फेरिक द्रोणीय रेषा कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाडा दरम्यान पसरली आहे. या हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे रायगड जिल्ह्यासह संपूर्ण कोकणात २ ते ४ जुलैदरम्यान काही ठिकाणी अतिमुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

या कालावधीत जिल्ह्यातील नद्या, ओढे आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता असून सखल भागात पाणी साचणे, पूरसदृश परिस्थिती निर्माण होणे तसेच घाट परिसरात दरडी कोसळण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा तसेच प्रवास करण्यापूर्वी रस्त्यांची व वाहतुकीची अद्ययावत माहिती घेऊनच प्रवास करावा.

अरबी समुद्रात समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता असल्याने रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांनी पुढील सूचना मिळेपर्यंत समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांनी भातशेती व भाजीपाला रोपवाटिकांमध्ये अतिरिक्त पाण्याचा तातडीने निचरा करावा. तसेच मुसळधार पावसाच्या काळात जनावरे सुरक्षित गोठ्यात ठेवून आवश्यक ती खबरदारी घ्यावी.

जिल्हा प्रशासनाने नागरिकांना हवामान विभाग, जिल्हा प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सूचना व इशाऱ्यांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

Comments

Popular posts from this blog