ब्रेकिंग न्यूज
🚨 रायगड जिल्ह्यात पावसाचे थैमान! अंबा नदीने ओलांडली धोक्याची पातळी, तर मुसळधार पावसामुळे १२ जणांचा मृत्यू... मालमत्ता व पशुधनाचे मोठे नुकसान, पंचनामे सुरू 🚨

रायगड जिल्ह्यात पावसाचे थैमान!

अंबा नदीने ओलांडली धोक्याची पातळी, तर मुसळधार पावसामुळे १२ जणांचा मृत्यू

 मालमत्ता व पशुधनाचे मोठे नुकसान 

रायगड, दि. ९ (विशेष प्रतिनिधी) :- रायगड जिल्ह्यात चालू पावसाळी हंगामात नैसर्गिक आपत्तीने मोठे संकट निर्माण केले असून प्रशासनाकडून ९ जुलै २०२६ रोजी सकाळी जाहीर करण्यात आलेल्या दैनंदिन प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १४८०.७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या तब्बल १५३.१% इतका आहे. जिल्ह्याची एकूण वार्षिक सरासरी ३१४८.६ मि.मी. असून, यंदा केवळ जून महिन्यात ६५५.८० मि.मी. सरासरीच्या तुलनेत ३३६.४ मि.मी. म्हणजेच ५१.३% पाऊस पडला होता, परंतु त्यानंतर जुलैच्या सुरुवातीला पावसाचा जोर प्रचंड वाढला आहे. या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली असून रोहा तालुक्यातील अंबा नदीने १०.०० मीटर पातळी गाठून आपली ९.०० मीटरची धोक्याची पातळी ओलांडली आहे. याशिवाय कुंडलिका (२२.८० मी.), सावित्री (३.९० मी.), पाताळगंगा (१९.८० मी.), उल्हास (४५.५० मी.) आणि गाढी (३.९० मी.) या इतर प्रमुख नद्या सध्या इशारा पातळीपेक्षा कमी प्रवाहाने वाहात असल्या तरी प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. धरणांचा विचार केला असता, जिल्ह्यातील ५.१२ टीएमसी साठवण क्षमता असलेला हेटवणे मध्यम प्रकल्प आजतागायत ७९.९८% भरला असून, जिल्ह्यातील २८ लघु प्रकल्पांपैकी २० प्रकल्प पूर्ण क्षमतेने म्हणजेच १००% भरले आहेत.

​या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात मोठी जीवितहानी झाली असून विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत एकूण १२ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर ३ जण जखमी झाले असून महाड येथील कुसगावमधून पूराच्या पाण्यात वाहून गेलेला १ जण अद्याप बेपत्ता आहे. मृतांमध्ये पनवेल तालुक्यातील पांडवकडा धबधबा, आपटा, दिघाटी व वाघाचीवाडी येथील पाण्यात बुडून व वाहून गेलेल्या ६ जणांचा, कर्जत तालुक्यातील नेरळ (टपालवाडी धबधबा), बेडीसगाव (भगीरथ धबधबा) आणि भागुचीवाडी येथील ३ जणांचा, तसेच महाड, खालापूर आणि अलिबाग येथील मृतांचा समावेश आहे. खालापूरमधील सुभाष नगर येथे दरड कोसळून ३ व्यक्ती जखमी झाल्या आहेत. वाहतुकीबाबत सांगायचे तर, जिल्ह्यात सध्या प्रमुख रस्ते व रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू असली, तरी सुरक्षेचा उपाय म्हणून पोलादपूर-महाबळेश्वर आंबेनळी घाट मार्ग, महाड तालुक्यातील वरंध घाट तसेच माणगाव तालुक्यातील ताम्हिणी घाट मार्ग हवामान विभागाच्या रेड अलर्ट व ऑरेंज अलर्टच्या कालावधीत वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत.

​सततच्या पावसामुळे मालमत्ता आणि पशुधनाचेही अतोनात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात एकूण ३३ मोठी जनावरे (बैल, गाय, म्हैस, डुक्कर) आणि १६७ लहान जनावरे (बकऱ्या) मरण पावली असून ७८३६ कोंबड्या व पक्षी दगावले आहेत. यामध्ये रोहा व माणगाव तालुक्यात सर्वाधिक पक्षी व लहान जनावरांचे नुकसान झाले आहे. घरांच्या नुकसानीचा आकडाही मोठा असून जिल्ह्यात ३ पक्की घरे आणि ५४ कच्ची घरे पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहेत, तर ६८६ पक्की घरे आणि २१२ कच्ची घरे अंशतः बाधित झाली आहेत. याव्यतिरिक्त ५ झोपड्या आणि ८३ गोठ्यांचे नुकसान झाले असून तब्बल ४९१३ घरांमध्ये आणि १९४ दुकानांमध्ये पाणी शिरल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील १८ पोल्ट्री फार्मचेही यामुळे नुकसान झाले आहे. सार्वजनिक मालमत्तेलाही पावसाचा मोठा तडाखा बसला असून कर्जत आणि रोहा येथील मंदिरे, महाड, उरण, पोलादपूर आणि तळा येथील जिल्हा परिषदेच्या शाळा, स्मशानभूमी व सभांमडप अशा एकूण २९ सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या अतिवृष्टीमुळे झालेल्या सर्व नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू असून लवकरच अंतिम आकडेवारी सादर केली जाणार आहे.

Comments

Popular posts from this blog