रा.जि.प. शाळा निवी ठाकूरवाडी येथे कुंडलिका बचाव समिती व पत्रकार मित्र संघातर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप
रोहा-रायगड (प्रतिनिधी) :- कुंडलिका बचाव समिती आणि पत्रकार मित्र संघ, रोहा यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हा परिषद शाळा, निवी ठाकूरवाडी येथे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि गोड खाऊचे वाटप नुकतेच करण्यात आले. कुंडलिका बचाव समितीचे सक्रिय सदस्य श्री. सागर कोकरे यांचा भाचा, चि. रेवांश याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या विशेष सामाजिक व शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लावण्याच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवर आणि ग्रामस्थांनी चि. रेवांश याला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देऊन त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
या कौतुकास्पद उपक्रमाप्रसंगी कुंडलिका बचाव समितीचे अध्यक्ष श्री. रमेश जोशी, सदस्य श्री. सागर कोकरे, तसेच CTEP कंपनीचे मॅनेजर श्री. हिमांशू श्रीवास्तव प्रामुख्याने उपस्थित होते. शाळा प्रशासनाच्या वतीने मुख्याध्यापिका वर्षा दळवी आणि शिक्षिका सानिया पठाण यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. तसेच गावकऱ्यांच्या वतीने गावचे अध्यक्ष श्री. होनाजी लेंडी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. धनाजी वारगुडे, उपाध्यक्षा उषा शिद आणि सदस्या कविता शिद यांनी या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या आनंददायी सोहळ्याला गुलाब लेंडी, मंदा शिद, नेहा सुतक, जयश्री लेंडी यांच्यासह शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित झाला होता आणि संपूर्ण गावातून या संयुक्त उपक्रमाचे आभार मानण्यात आले.

Comments
Post a Comment