ब्रेकिंग न्यूज
🚨 डिजिटल न्यूज पोर्टल्स आणि सोशल मीडिया न्यूज चॅनेल्सना केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे नोंदणी करणे बंधनकारक! 🚨

मुंबईमध्ये एस. सी. उपवर्गीकरणा विरोधात आंबेडकरी समाजाचा विराट मोर्चा!

आझाद मैदानामध्ये जनसागर उसळला

माणगाव-रायगड (उत्तम तांबे) :- महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जाती (एस.सी.) अंतर्गत ‘अ, ब, क, ड’ असे उपवर्गीकरण करण्याचा घाट घातला असून, या प्रस्तावाला आंबेडकरी समाजातून तीव्र विरोध दर्शवला जात आहे. या अन्यायी निर्णयाविरोधात आणि आरक्षणाच्या मूळ चौकटीचे रक्षण करण्यासाठी ३० जून २०२६ रोजी मुंबईत आंबेडकरी समाजाच्या वतीने एक ऐतिहासिक आणि विराट मोर्चा काढण्यात आला. बौद्धजन पंचायत समितीचे सभापती तथा रिपब्लिकन सरसेनानी आनंदराज आंबेडकर तसेच भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या खंबीर नेतृत्वाखाली हा धडक मोर्चा काढण्यात आला. मेट्रो सिनेमा येथून सुरू झालेला हा महामोर्चा विधानभवनाच्या दिशेने निघाला असता, संपूर्ण मुंबई परिसर निळ्या झेंड्यांनी आणि गगनभेदी घोषणांनी दणाणून गेला. या अभूतपूर्व जनसमुदायामुळे आझाद मैदानामध्ये जणू काही निळा जनसागरच लोटला होता.

​या विराट सभेला संबोधित करताना रिपब्लिकन सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी अत्यंत आक्रमक आणि संघर्षमय विचार मांडले. ते म्हणाले की, अनुसूचित जाती अंतर्गत उपवर्गीकरण करून बहुजन समाजात आणि उपजातींमध्ये फूट पाडण्याचे एक मोठे षडयंत्र महाराष्ट्र सरकार रचत आहे, जे आंबेडकरी समाज कधीही खपवून घेणार नाही. सरकारने हे षडयंत्र त्वरित थांबवावे, अशी चेतावणी त्यांनी दिली. पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, हा लढा केवळ एका विशिष्ट समाजाच्या हक्कांपुरता मर्यादित नसून, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनात्मक आरक्षणाची मूळ चौकट अबाधित राखण्यासाठी, तसेच देशातील संविधान, सामाजिक न्याय, समता आणि बंधुता यांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी पुकारलेला हा एक व्यापक संघर्ष आहे.

​या महामोर्चाच्या माध्यमातून आंदोलनकर्त्यांनी राज्य सरकारसमोर अत्यंत महत्त्वपूर्ण मागण्यांचा जाहीरनामा मांडला. यामध्ये प्रामुख्याने माजी न्यायमूर्ती अनंत बदर समितीचा अहवाल तात्काळ सार्वजनिक करण्यात यावा, अनुसूचित जातींचा शासकीय नोकऱ्यांमधील अनेक वर्षांपासूनचा थकीत अनुशेष विशेष मोहीम राबवून त्वरित भरण्यात यावा, आणि मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये मिळणारे हक्काचे आरक्षण विनाविलंब लागू करावे, या मागण्यांचा समावेश आहे. याशिवाय, सामाजिक न्याय विभागासाठी मंजूर करण्यात येणारा निधी इतर कोणत्याही विकासकामांकडे न वळवता, तो केवळ आणि केवळ अनुसूचित जातींच्या कल्याणकारी व शैक्षणिक योजनांसाठीच खर्च करण्यात यावा, अशी आग्रही मागणी सरकारकडे करण्यात आली.

​या ऐतिहासिक जनआंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून आंबेडकरी चळवळीतील प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. यामध्ये भारतीय बौद्ध महासभेचे ब्रिगेड शाखा पदाधिकारी, माजी मंत्री बबनराव घोलप, राष्ट्रीय चर्मकार संघाचे अध्यक्ष व माजी मंत्री राजकुमार बडोले, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. सुरेश माने, राष्ट्रीय चर्मकार संघाचे बाबुराव माने, राजाराम पाटील, डॉ. बाबा कांबळे, शरद शिर्के आणि राहुल जाधव यांच्यासह अनेक मातब्बर नेत्यांचा समावेश होता.

​तसेच, मुंबई लगतच्या रायगड जिल्ह्यातूनही मोठ्या संख्येने जनसमुदाय या मोर्चात सहभागी झाला होता. बौद्धजन पंचायत समिती, माणगाव तालुक्याचे अध्यक्ष रवींद्र मोरे, प्रमुख सल्लागार ॲड. नरेश जाधव, सहसचिव रणजीत मोहिते, शाखा क्रमांक १ चे सचिव विनोद मोरे, शाखा क्रमांक ८ चे अध्यक्ष संदेश साळवी आणि शाखा क्रमांक ४ चे सचिव मुकेश सकपाळ या मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली कोकणातून हजारो कार्यकर्त्यांनी आझाद मैदानात हजेरी लावून या हक्काच्या लढ्याला बळ दिले. जोपर्यंत सरकार या मागण्यांवर ठोस निर्णय घेत नाही, तोपर्यंत हा संघर्ष असाच तीव्र राहील, असा निर्धार या प्रसंगी व्यक्त करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog